सौदी अरेबियात प्रथमच मद्यविक्रीचे दुकान सुरु ; ‘हे’ आहे यामागील कारण..

रियाध:  सौदी अरेबियामध्ये १९५० च्या दशकापासून मद्यबंदी आहे. सौदी अरेबियाचे सत्ताधीश अब्दुल अझीझ यांचे पुत्र मिशारी यांनी मद्याच्या नशेत एका ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर राजे अझीझ यांनी संपूर्ण देशात मद्यबंदी जाहीर केली होती. परंतु सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांनी या देशाला पर्यटन आणि व्यापाराचे केंद्र बनविण्याचे ठरविले आहे. अर्थव्यवस्था केवळ कच्च्या तेलाच्या निर्यातीवरच अवलंबून राहू नये, असे त्यांचे मत आहे. त्यामुळेच त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत पूर्णपणे बंदी असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानाला राजधानी रियाधमध्ये परवानगी देण्यात आली आहे.

सध्या एकच दुकान उघडण्यात आले असून येथे केवळ इतर देशांच्या आणि मुस्लिम नसलेल्या राजदूतांनाच प्रवेश दिला जाणार आहे. कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जसे मद्यविक्रीचे दुकान असते, तसेच हे दुकान आहे. या दुकानात सध्या निवडक प्रकारचेच मद्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.