नवी दिल्ली: ‘प्रधानमंत्री सूर्य घर: मुफ्त बिजली योजना’ या सौर छत योजनेत एक कोटींपेक्षा जास्त घरांनी नोंदणी केली, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. हे एक सकारात्मक वृत्त आहे, असे त्यांनी सांगितले. देशातील सर्वच भागांतून नोंदणी करण्यात आली.
आसाम, बिहार, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेशातून पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी अर्ज दाखल केले आहेत, असे मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. नोंदणी न करणाऱ्यांनी तातडीने करून घ्यावी. या उपक्रमाला ऊर्जा उत्पादन सुनिश्चित करण्यासोबतच घरांसाठी वीज खर्चात भरीव कपात करण्याचे वचन देण्यात आले असल्याचे मोदी म्हणाले. ते पृथ्वीसाठी चांगले योगदान देऊन पर्यावरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मागील महिन्यात छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी एक कोटी घरांसाठी दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ७५,०२१ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली.