पुणे : पदाधिकारी मेळाव्यात बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. मनसे विधानसभेच्या २२५ ते २२५ जागा लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडून आणणारच असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. जो निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाईल असंही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
दरम्यान राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसेच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर आता हडपसरमधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. साईनाथ बाबर यांनी व्हाट्सअप स्टेट्स ठेवत तयारीला सुरुवात केली आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी महायुतीला पांठिबा देण्यापूर्वी दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. एवढंच नाही तर त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात काही सभा देखील घेतल्या. मात्र त्यानंतर आता त्यांनी विधानसभेत स्वबळाचा नारा दिला आहे. मनसे राज्यात विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.