भुसावळ : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने विरारच्या सराफाला भुसावळात बोलावून दोघा भामट्यांनी साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी अनोळखी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक करणारी टोळी परप्रांतीय असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली.
असे आहे फसवणूक प्रकरण
विरारमधील सराफा व्यावसायीक राजकुमार जवाहर सोनी (38, विरार ईस्ट, रामू कम्पाउंड, सी विंग, विरार) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा परीचीत मित्र अजय नारायण कुंभार (ठाणे) याने मित्र सुरजसिंग कडे तीन हजार 500 सोने आहे व तो स्वस्तात ते विक्री करणार असल्याचे सोनी यांना सांगितले. स्वस्तात सोने मिळणार असल्याने या आमिषाला सोनी हे बळी पडले व त्यांनी सुरजसिंगशी संपर्क साधल्यानंतर त्याने छत्तीसगड येथून भुसावळ येथे येणार असल्याचे सांगितले व शंभर ग्रॅम सोने सुरूवातीला देण्याचे सांगून फोनवर डिल पक्की केली.
पैसे मिळताच संशयित पसार
ठरल्याप्रमाणे तक्रारदार सोनी हे अजय कुंभारसोबत 10 रोजी सकाळी 7.30 वाजता भुसावळ शहरात दाखल झाले. यावेळी संशयिताने राष्ट्रीय महामार्गावरील राजस्थान मार्बलजवळ तक्रारदाराला बोलावले. संशयित सुरजसिंगने आपल्याकडील सोन्याचे तुकडे नमूनेदाखल सोनी यांच्याकडे दिले असता हे सोनी यांनी हे सोने 18 कॅरेटचे असल्याचे सांगितले व शंभर ग्रॅम सोने साडेतीन लाख रुपयात घेण्याचा सौदा झाल्यानंतर रक्कम असलेली बॅग सुरजसिंगकडे सोपवली असता काही कळण्याआत सुरजसिंग व त्याचा साथीदार बॅगेसह पसार झाला. उभयंतांनी त्यांचा पाठलाग केला मात्र उपयोग झाला नाही. ही घटना राजस्थान मार्बलजवळील रेल्वे पुलाखाली 10 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोनी यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली मात्र आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्याने संशयिताची छबी मिळू शकली नाही. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.