स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाचे विधिमंडळात पडसाद,भाजपाच्या आमदारांनी केला निषेध

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचे पडसाद शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात उमटले. वीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारकर वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.हे वक्तव्य काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पूत्र प्रियांक खर्गे यांनी नुकतेच वीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले.

‘मी विधानसभेचे अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता. सावरकर यांचे योगदान काय? सावरकर यांना वीर ही पदवी कशी मिळाली? ज्यांची विचारधारा द्वेष आणि फूट पाडत असेल, त्यांचा फोटो नको. त्यामुळे सावरकरांचे चित्र विधानसभेत नसावे’, असे वक्तव्य खर्गे यांनी केले.

त्याच्या निषेधार्थ भाजपाच्या आमदारांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. ‘स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणाऱ्यांचा निषेध’, ‘काँग्रेसची धुणी धुणाऱ्या उबाठाने उत्तर द्यावे’, ‘उबाठा जबाब दो’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे, कालिदास कोळंबकर, आशिष शेलार, योगेश सागर, अमित साटम, राम कदम, भारती लव्हेकर, मनिषा चौधरी यांच्यासह भाजपाचे आमदार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.