स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज उलगडणार छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा

मुंबई :  समस्त हिंदू समाजाच्या वतीने सोलापुरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील कथावाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान सात दिवसीय चालणाऱ्या या कार्यक्रमात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज हे मराठीतून उपस्थितांना मार्गदर्शन करतील. भारतात प्रथमच अशा पद्धतीचा कार्यक्रम सोलापूरात होत आहे. दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० दरम्यान जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सदर कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.

समस्त हिंदू समाज सोलापूरतर्फे ही विशेष पर्वणी शिवभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याची माहिती कथा रूपाने मराठी भाषेत सांगण्याची ही पहिलीच वेळ आहे. प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून ही कथा मराठीतून ऐकण्याची सुवर्णसंधी सोलापूरकरांसह महाराष्ट्रातील शिवभक्तांना मिळणार आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म, शिव संस्कार, शिवप्रताप, शिवधैर्य, शिवशौर्य, शिवचातुर्य आणि शिवविजय या सात विषयांवर सात दिवस श्री शिवचरित्रातील विविध प्रसंग प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आपल्या ओघवत्या शैलीतून शिवभक्तांसमोर मांडणार आहेत.

तत्पूर्वी यानिमित्ताने गुरुवार, दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता समस्त हिंदू समाजातर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून ही शोभायात्रा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौकमार्गे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे विसर्जित होईल. शोभायात्रा कथेच्या ठिकाणी आल्यानंतर प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे मार्गदर्शन सर्वांना प्राप्त होईल.