हरभजन सिंग भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या मार्गावर ?

भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक कोण असेल हा सध्या बीसीसीआयसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळात प्रचंड गोंधळ सुरू आहे. मंडळाने काही नावे शॉर्टलिस्ट केली असली तरी अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर या पदासाठी स्टीफन फ्लेमिंग आणि गौतम गंभीर हे सर्वात मोठे दावेदार आहेत. मात्र फ्लेमिंगशी चर्चा न झाल्याने गंभीरचे नाव अंतिम मानले जात आहे. दरम्यान, अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यानंतर तो गौतम गंभीरला मागे टाकणार  का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राहुल द्रविडचा कार्यकाळ 30 जून 2024 रोजी संपणार आहे. BCCI ने भारतीय संघाच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2027 असा ठेवला आहे आणि त्यासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत हरभजन सिंगने प्रशिक्षक बनण्याबाबत सांगितले की, क्रिकेटने त्याला खूप काही दिले आहे, जर त्याला संघाला काही परत देण्याची संधी मिळाली तर तो खूप आनंदी होईल.

मात्र, हरभजनने असेही म्हटले आहे की, तो यासाठी अर्ज करेल की नाही हे माहित नाही, पण त्याच्या या वक्तव्यानंतर या शर्यतीत गौतम गंभीरसोबत आणखी एक स्पर्धक नक्कीच दिसला आहे. टीम इंडियाच्या कोचिंगबाबत हरभजन सिंग म्हणाला की, हे काम खेळाडूंना शिकवण्यापेक्षा त्यांना सांभाळण्याचं आहे. भारतीय संघातील खेळाडूंना ड्राईव्ह आणि पुल शॉट्स कसे मारायचे हे माहित आहे.

प्रशिक्षक होण्यासाठी कोणते निकष आहेत?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआय आधी सर्व अर्ज पाहणार आहे. यानंतर, अर्ज केलेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. भारतीय क्रिकेट बोर्डाने अर्जासाठी काही निकष लावले आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, या पदासाठी फक्त तीच व्यक्ती अर्ज करू शकते, ज्याचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे आणि त्याने किमान ३० कसोटी किंवा ५० एकदिवसीय सामने खेळले आहेत.

जर एखाद्याने दोन वर्षे कसोटी खेळणाऱ्या देशाचे प्रशिक्षकपद भूषवले असेल, तर तोही अर्ज करू शकतो. याशिवाय ज्यांना आयपीएल, असोसिएट मेंबर, इंटरनॅशनल लीग, फर्स्ट क्लास टीम किंवा नॅशनल ए टीममध्ये तीन वर्षांचा कोचिंगचा अनुभव आहे त्यांनाही या पदासाठी पात्र मानले जाईल. त्याच वेळी, ज्या प्रशिक्षकांनी बीसीसीआयकडून लेव्हल 3 किंवा त्याच्या समकक्ष प्रमाणपत्र प्राप्त केले आहे ते देखील अर्ज करू शकतात.