नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २६/११ रोजीच्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीझ सईदला आमच्याकडे सोपवा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करेल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. हाफीझ सईद २६/११ आणि २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आहे.
शिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. सध्या तो पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मागील वर्षी पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने हाफीझला ३२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी हाफीझला पाच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ३६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, या शिक्षा एकत्रित मोजण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण ३६ वर्षांचा कारावास त्याला भोगावा लागणार आहे. हाफीझ खरच पाकिस्तानातील तुरुगांत शिक्षा भोगतो का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्याला पकडणाऱ्याला एक लाख डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा अमेरिकेने केली आहे.