---Advertisement---
वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा करण्यास परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मुस्लिम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने सोमवारी म्हणजेच आज मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली. तळघरात व्यासजींची पूजा सुरू राहील. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार, जिल्हा न्यायाधीशांनी ज्ञानवापीबाबत दिलेला आदेश तसाच राहणार आहे. पहिल्या आदेशानुसार तळघरात पूजा सुरू राहणार आहे. मात्र, या निर्णयाविरोधात मुस्लिम बाजू सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते. हिंदू पक्षातर्फे वकील विष्णू शंकर जैन आज न्यायालयात हजर झाले. त्यांनी सांगितले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीची (AIMC) याचिका फेटाळली आहे.
मुस्लिम पक्षाने वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाला घटनाबाह्य म्हटले आहे.
31 जानेवारीच्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार मूर्ती तळघरात ठेऊन पूजा केली जात होती, याविरोधात मुस्लीम बाजूने विरोध होत आहे. मुस्लिम पक्षाने वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाला घटनाबाह्य ठरवले होते. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. हिंदूंच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील सीएस वैद्यनाथन आणि विष्णू शंकर जैन यांनी युक्तिवाद केला. त्याचवेळी मुस्लिम पक्षातर्फे वकील सय्यद फरमान अहमद नक्वी आणि अधिवक्ता पुनीत गुप्ता यांनी बाजू मांडली.