नवी मुंबई: आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या संमेलनासाठी उपस्थिती लावली आहे. आजपासून 3 दिवस हे संमेलन असणार आहे. वाशीच्या सीडको प्रदर्शन केंद्रावर संमेलन पार पडणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “राज ठाकरे येतील, तुमच्याशी बोलतील, अनेक विषय सुचवतील, मराठीला कसं पुढे न्यायचं हे सांगतील. पण मी आज तुमच्यासमोर उभा आहे. गेली अनेक वर्ष मराठी विषयावर बोलतोय, अंगावर केस घेतल्या आहेत, मराठी विषयासाठीच मी जेलमध्ये गेलो. मी आताही तेच सांगत होतो की, मी अत्यंत कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारही त्याचप्रकारचे झाले आहेत. आजोबांचे पुस्तकरुपात झाले, बाळासाहेंबांचे, माझ्या वडिलांचे झाले आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचे झाले आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे, हे जसंजसं समजत गेलं, तसतसा मी आणखी त्याच्या प्रेमात पडत गेलो. जूनमध्ये मला अमेरिकेतील मराठी मंडळानं आमंत्रण दिलं. याचे अध्यक्ष मला भेटले त्यांनी मला सांगितलं की, आम्ही अमेरिकेत 100 मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरु होतात, हे काही कमी आहे का?”
राज ठाकरे पुढे म्हणाले,मला असं वाटतं की, महाराष्ट्रात लक्ष देणं गरजेचं आहे. जगभरात मराठी माणूस पसरलेला आहे, इतर देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल अभिनंदन. जेवढा महाराष्ट्राचा विचार इतर लोकांमध्ये, देशांमध्ये नेता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत, हे सांगता येईल ते उत्तमच. महाराष्ट्रात, महाराष्ट्रातील शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्यावेळी हिंदी कानावर येऊ लागते, त्यावेळी मला त्रास होऊ लागतो. भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम. पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे, जशी मराठी, तमिळ, तेलगु, गुजराती भाषा आहेत, तशीच हिंदीसुद्धा भाषा आहे. या देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही, राष्ट्रभाषा म्हणून कोणतीही भाषा नेमली गेलीच नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा ठेवल्या. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे, हे जेव्हा पहिल्यांदा मी बोललो, त्यावेळी अनेकजण माझ्या अंगावर आले. असे ते म्हणाले