हिंदू समाजाला संघटित होण्याची गरज, सक्षम झाल्यानेच जगात भारताची प्रतिष्ठा वाढली : सरसंघचालक

 बारां : सक्षम आणि सामर्थ्यशाली असल्यानेच जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. सक्षम देशाच्या प्रवाशांना जगात तेव्हाच सुरक्षा मिळते, जेव्हा त्यांचे राष्ट्र सबल असेल. अन्यथा, निर्बल राष्ट्राच्या प्रवाशांना देश सोडण्याचा आदेश दिला जातो. भारताचे मोठे होणे हे प्रत्येक नागरिकासाठी तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

बारां दौऱ्यावर असताना सरसंघचालकांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, हिंदू समाजाला आपल्या सुरक्षेसाठी भाषा, जाती, प्रांत हे भेद आणि विवाद मिटवून संघटित व्हावे लागेल. समाज असा असावा जिथे संघटन, स‌द्भावना आणि आत्मियतेचा व्यवहार असावा. समाजात आचरणातील शिस्त, देशाविषयी कर्तव्यभावना आणि ध्येयनिष्ठा हे गुण आवश्यक आहेत. मी आणि माझे कुटुंब एवढाच विचार करून समाजनिर्मिती शक्य नाही, याउलट, समाजाविषयीच्याच्या सर्वांगीण विचाराने आपण जीवनात परमेश्वरप्राप्तीही करून घेऊ शकतो.

मोठ्या संख्येने उपस्थित स्वयंसेवकांना संबोधित करताना डॉ. भागवत म्हणाले, स्वयं सेवकांनी समाजातील सर्व स्तरात आपला संपर्क प्रस्थापित केला पाहिजे. समाजात समरसता, न्याय, आरोग्य, शिक्षा आणि स्वावलंबनासाठी आग्रह धरला पाहिजे. यासंदर्भातील सर्व कार्यांमध्ये स्वयंसेवकांनी सक्रिय राहायला हवे. जीवनात अगदी लहान-सहान चांगल्या गोष्टीही आचरणात आणल्याने समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीत फार मोठे योगदान दिले जाऊ शकते.

भारत एक हिंदू राष्ट्र

सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले की, भारत एक हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू शब्दाचा वापर देशात राहणाऱ्या लोकांच्या सर्व संप्रदायांसाठी वापरला जातो. हिंदू नाव नंतर आले असले तरी, आपण येथे प्राचीन काळापासून राहत आहोत. येथे राहणाऱ्या भारतातील सर्व संप्रदायांसाठी हिंदू शब्द वापरला जातो. हिंदू असे आहेत, जे सर्वांना आपले मानतात आणि सर्वांना आपलेसे करतात. हिंदू म्हणतो, आम्हीही योग्य आणि तुम्हीही तुमच्या जागी योग्य आहात. आपसात सातत्याने संवाद करत स‌द्भावनेने राहिले पाहिजे, हाच हिंदूंचा स्थायीभाव आहे.