हिंदू धर्म हा सर्वांच्या हिताचीच कामना करणारा असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं असून, त्यांच्या या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. हिंदू धर्माचा अर्थच मुळात जगातील सर्वात उदार व्यक्ती असा असून, या व्यक्तीला सर्वच स्वीकारार्ह असतं अस ते म्हणाले. इतक्यावरच न थांबता भागवत यांनी स्वयंसेवकांना सामाजिक एकोप्याच्या मदतीनं बदल घडवून आणण्याचं आवाहन करत अस्पृश्यतेची भावनाच पूर्णपणे मिटवून टाकायची आहे असं म्हटलं.
अलवर येथील इंदिरा गांधी क्रीडा मैदानात स्वयंसेवकांच्या एकत्रीकरण कार्यक्रमाला संबोधित करताना भागवत यांनी ही वक्तव्य करत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आपल्या देशाला सामर्थ्य करायच असून, आम्ही प्रार्थनेमध्येच म्हटलं आहे, की हे हिंदू राष्ट्र आहे. कारण, हिंदू समाजच त्याचा उत्तराधिकारी आहे. या राष्ट्राच्या हितातच हिंदू समाजाची किर्ती वाढते. राष्ट्रात काही बिनसल्यास त्याचा दोषही हिंदूंवरच येतो. कारण, तेच या देशाचे कर्ते आहेत’, असं भागवत म्हणाले.
हिंदू राष्ट्राला वैभवसंपन्न करण्याबरोबरच देशाला आणखी बलशाली करण्याचं काम पुरुषार्थाच्या भावनेनं करत संपूर्ण देशाला या सामर्थ्यायोग्य करण्याची आवश्यकता असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. ‘आपण ज्यांना हिंदू म्हणतो तोच प्रत्यक्षात मानव धर्म असून, वैश्विक धर्म आहे. सर्वांच्या कल्याणाची कामना याच धर्मातून होते. मुळात हिंदूंचा अर्थच आहे जगातील सर्वात उदार मानव. ज्याच्या मनात प्रत्येकासाठी सद्भावना आहेत. हिंदू म्हणजे पराक्रमी पूर्वजांचे वंशज, जे त्यांच्या विद्येचा वापर वादांसाठी करत नसून, ज्ञानप्रसारासाठी करतात’, या शब्दांत भागवत यांनी हिंदूं पताका उचलून धरली.
एक काळ असा होता जेव्हा संघाला कोणी ओळखत नव्हतं आणि त्या विचारधारणेला कोणी समजून घेत नव्हतं. पण, आता मात्र संघाला सर्वदूर ओळख मिळाली आहे असं म्हणत विरोधी गटही संघाचा उघडपणे विरोध करत असला तरीही अंतर्मनातून ही विचारधारणा समजून घेतो असं सूचक वक्तव्य भागवतांनी केलं. माध्यमांच्या गैरवापरामुळं नवी पिढी संस्कार विसरत चालली आहे असं म्हणताना भारतातही संस्कार धोक्यात असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.