तरुण भारत लाईव्ह । डॉ. अलका कुलकर्णी । का रे बाबा रुसलायस? मी वाट बघतोय ना रे तुझी! गणेश बाबूला खंत वाटत होती. त्याने बागेकडे नजर टाकली. येथे चक्क दीड हजार दुर्मिळ, औषधी वनस्पती मुद्दाम जतन करून ठेवल्या होत्या. एकेका झाडाला योग्य पद्धतीने वाढवले जात होते; म्हणजे एखादी वनस्पती ज्या वातावरणातून येथे आणलेली असे, तसे वातावरण येथे निर्माण केले जाई, म्हणजे रोपाला परक्या प्रदेशात आलोय असे वाटू नये! तरी हे ‘एम्ब्लीया रायबीस’ वाढायला तयार नव्हते. गणेश बाबू मग रोज त्या रोपाची विचारपूस करू लागला. उठा आता! वाट पाहतोय मी. मला तुझं पान कसं आहे बघायचंय. खूप खूप उंच वाढायचंय न तुला? इतके महिने आळशी राहून नाही चालत.
…आणि काय आश्र्चर्य! काही दिवसात रोपाला एक पान फुटले. गणेश बाबूने बागेतल्या सगळ्या माळ्यांना एकत्र करीत रोपासमोर आणले. खूप गुणकारी आहे हे झाड बरं! गणेशने त्याचे औषधी गुण सगळ्यांना समजाऊन सांगितले. आपण सगळे वाट बघतोय आणखी फूट येण्याची. एके दिवशी तर गणेश बाबूने बागेच्या डायरेक्टरनांही बोलावून झाड दाखवले. त्यानंतर झाड झपाट्याने वाढू लागले.
‘हॅ थापा आहेत या सगळ्या.’ गणेश बाबू आणि त्याचे झाड बागेत सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झाले होते, मग इतरांची असूया उफाळून का नाही येणार? एकाने ह्याच जातीची 100 झाडे आणून बागेत लावली, ज्यातली नव्याण्णव मेली. आता जगवा ते एक उरलेले झाड. बघू तरी तुमची करामत!’ आव्हान स्वीकारले गेले आणि हे शंभरावे झाड जगले. कारण? त्याच्याशी रोज होणारे हितगूज. गणेश बाबू झाडांशी तमिळमध्येे बोलतात, पण भाषा महत्वाची नाही तर तिचा भाव आणि उद्देश महत्वाचा.
एक झाड मात्र प्रतिसाद देत नव्हते. शेवटी गणेश बाबूंनी ते कुठून आणलेय ते पाहिले. मूळ स्थानी त्याच्या आजूबाजूला जी झुडूपं होती तू त्यांनी झाडाभोवती लावली. मित्र आले सोबतीला आणि झाड आपले एकटेपण विसरत जोमाने वाढू लागले.
विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीस सर जगदीशचंद्र बोस यांनी क्रेस्कोग्राफ निर्माण करून जगाला दाखवून दिले की, वनस्पतींना भावभावना असतात. संत तुकारामांनी आपल्याला ह्या सोयरांची ओळख 300 वर्षांपूर्वी करून दिली होतीच.
ठेऊ या ना ही आठवण जपून!