चाकरमान्यांसह प्रवाशांना अत्यंत सोयीची असलेली 11025 व 11026 पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस आता अमरावतीहून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आल्याने रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत. मूळातच कोरोनानंतरच्या काळात नियमित नसलेली ही गाडी अमरावतीपर्यंत विस्तारीत झाल्याने भुसावळ व विभागातील रेल्वे प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याने प्रवासीवर्गात संतापाचे वातावरण आहे. भुसावळातून पुण्याला जाण्यासाठी स्वतंत्र गाडी सुरू करण्याची मागणी पूर्ण झाली नसताना आहे ती गाडी आता अमरावतीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भुसावळ विभागातील प्रवाशांना गाडीत जागाच मिळणार नसल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी याबाबत मूग गिळून गप्प असल्याने अधिक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अमरावतीहून सुटणार एक्स्प्रेस
11025, 11026 पुणे-भुसावळ पुणे ही प्रतिदिन धावणारी हुतात्मा एक्सप्रेस आता भुसावळऐवजी अमरावती येथून सुटेल. भुसावळसह यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चोपडा आदी भागातून पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे भुसावळ स्थानकातून पुण्यासाठी स्वतंत्र गाडी असावी, अशी मागणी होती. या मागणीनुसार गेल्या काळात ही गाडी मनमाड येथून विस्तार करीत भुसावळ स्थानकावरुन सुरू करण्यात आली होती. कोरोनानंतरच्या काळात ही गाडी बऱ्याचवेळा बंद राहत असल्याने भुसावळ विभागातील प्रवाशांनी हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. रेल्वे विभागाने ही गाडी सुरू केली मात्र आता ती भुसावळऐवजी अमरावती येथून धावणार आहे. यामुळे या गाडीचा भुसावळ परीसरातील प्रवाशांऐवजी विदर्भातील प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे.
अतिरिक्त भाड्याचा भुर्दंड
भुसावळ परिसरातून पुणे येथे जाण्यासाठी प्रवाशांना एकही हक्काची रेल्वे नाही. दिवाळीच्या दीड महिना पूर्वीच रेल्वेेचे तिकिट नो रुम झाल्याने भुसावळकरांना लक्झरीचे 2500 रुपये तिकिट काढून प्रवास करावा लागणार आहे. यामुळे भुसावळातून पुण्यासाठी स्वतंत्र एक्स्प्रेसची मागणी आहे. हुतात्मा एक्स्प्रेस एक चांगला पर्याय होती मात्र आता तीदेखील अमरावतीपासून सुरू झाल्याने भुसावळकरांना या गाडीचा फारसा फायदा होणार नाही.
खासदार खडसेंनी दिले पत्र
रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्स्प्रेस अमरावतीहून चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुसावळ विभागाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना हुतात्मा एक्स्प्रेस ही भुसावळ येथूनच सोडण्याची मागणी केल्याचे त्या म्हणाल्या. या संदर्भात त्यांना पत्र दिल्याचेही त्या म्हणाल्या.