‘…हौसलों से उडान होती है!’जिनके सपनों मे जान होती है

‘मंझिलेंं उन्ही को मिलती है
जिनके सपनों मे जान होती है
पंखो से नही, हौसलों से उडान होती है’

गोंडवाना विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन नाईक आणि स्वयंसेविका जान्हवी पेद्दीवार यांच्या कर्तृत्वाची कथा काहीशी अशीच आहे. जुलै 2021 च्या आकडेवारीनुसार, देशात 5 हजार 288 विद्यापीठे होती. त्यात आता आणखी थोडी भर पडली असेल. एवढ्या विद्यापीठांमध्ये महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकावरील गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातले आणि जेमतेम एक तप पूर्ण केलेले गोंडवाना विद्यापीठ देशात नेमके कुठे आहे, हेही अनेकांना माहिती नसेल. पण या विद्यापीठाने इतिहास रचला आणि सर्वांच्या नजरा अद्याप बाळसे धरत असलेल्या या विद्यापीठाकडे आपसूकच वळल्या.

महाराष्ट्राच्या इतिहासात एकाच वेळी रासेयोचे दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पहिले विद्यापीठ म्हणून ‘गोंडवाना’चा नावलौकिक झाला आहे. डॉ. पवन नाईक व जान्हवी पेद्दीवार या दोघांची एकाच वेळी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आणि शुक्रवारी त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात जेव्हा या पुरस्काराची उद्घोषणा होत होती तेव्हा सभागृहात उपस्थित सर्वांचे लक्ष जान्हवी व पवन यांच्यावर केंद्रित झाले होते. कारण हे दोघेही ज्या भागातून आले होते तो अतिशय दुर्गम आणि नक्षलग्रस्त म्हणून कदाचित त्यांना माहीत असेलही; पण एका सृजनशील कार्यासाठी त्यांना पुरस्कृत केले जात आहे, हे पाहून त्यांनी निश्चितपणे या दोघांचे कौतूक केले असेल.

गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी येथील केवलरामजी हरडे महाविद्यालयाच्या सेवा योजनेतील डॉ. पवन नाईक व जान्हवी पेद्दीवार हे निःस्वार्थ सेवा आणि अथक समर्पणाच्या सामर्थ्याचेच प्रतिनिधित्व करतात. स्वयंसेवक म्हणून जान्हवीचे उल्लेखनीय आणि समाजाप्रती जबाबदारीच्या सखोल भावनेने चालवलेले अनेक उपक्रम सेवेचे प्रतिबिंब आहे. कोविड काळात अनेक गावांमध्ये जनजागृती मोहिमेचे आणि लसीकरण मोहिमेचे नेतृत्व तिने केले. महामारीच्या पलीकडे, उज्ज्वला योजना, मासिक पाळी, स्वच्छता आणि अन्य विविध कल्याणकारी कार्यक्रमांची जनजागृती करण्यात जान्हवीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. तिच्या प्रयत्नांतून आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करणे, मानसिक आरोग्याविषयी, पर्यावरणाविषयी जागरण करणे आणि विशेष म्हणजे, ‘शासन तुमच्या दारी’ या उपक्रमातून सरकारी कार्यक्रमांचे फायदे गरजू लोकांपर्यंत पोहोचले गेले. दारू आणि तंबाखूच्या तावडीतून मुक्त समाज निर्माण करण्यात तिने खारीचा वाटा उचलला. मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत असतानाच अनेक गावांमध्ये लहान धरणे आणि कच्चा रस्ता बांधणे, सेंद्रिय शेतीला चालना देण्याचेही काम तिने केले. वागदरा गावात जान्हवीच्या चमूने केलेल्या अथक परिश्रमामुळे 70 टक्के शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केला आहे, हे उल्लेखनीयच आहे. केवळ स्थानिक पातळीवर नव्हे, तर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शिबिरांमध्ये सहभाग, एड्स जागृतीसाठी रेड रिबन क्लबमधील सदस्यत्व एका व्यापक सामाजिक समस्यांच्या सोडवणुकीत तिची बांधिलकी दर्शवते. डिजिटल साक्षरता आणि प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रीन व्हिलेज’ला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न पर्यावरणीय शाश्वततेकडे तिच्या दूरदर्शीचे उदाहरण आहे. एक स्वयंसेविका म्हणून जान्हवीचा प्रवास ही केवळ सेवेची कथा नाही, तर सर्वांसाठी आशेचा आणि प्रेरणेचा किरण ठरावी अशी आहे. या सर्व कार्यात अवघ्या चमूचे नेतृत्व डॉ. पवन नाईक यांनी केले. त्यामुळे त्यांचेही कौतुक करावेच लागेल. अर्थात, त्यामागे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे यांनी केलेली पाठराखणही तेवढीच महत्त्वाची आहे आणि म्हणून या सर्वांचे अभिनंदन केले पाहिजे…

‘कौन कहता है कि आसमां मे सुराख नही हो सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों….’
दुष्यंत कुमार यांची ही शायरी या अतुलनीय कार्याची पावती ठरावी.

-9881717832

संजय रामगिरवार