तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। देशात यावर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यातच संपूर्ण ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेला. राज्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. १३ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट असून काही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
या स्थितीवर मात करण्यासाठी राज्यात जोरदार पावसाची गरज आहे. दुष्काळाच्या सावटात असलेल्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील वाशीम, अकोला आणि अमरावती या तीन आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. राज्यातील ३६ पैकी १३ जिल्ह्यात पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याची स्थिती गंभीर आहे.
कोकण आणि गोव्याचा काही भाग तसेच ठाणे आणि नांदेड जिल्हा सोडल्यास इतर ठिकाणी पाऊस सरासरी इतका आहे. राज्यातील १३ जिल्ह्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. यात अहमदनगर. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, व अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.हे तेराही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
जून ते सप्टेंबर असा पावसाचा कालखंड आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस होत असतो. सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होत असते. मागील काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास सप्टेंबर महिन्यात पाऊस कमीच असतो. दरम्यान आजपासून पुढील पाच ते सात दिवसांचा अंदाज पाहिल्यास या काळात खूप असा पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.