अहमदनगर: मराठा आरक्षणासंबंधी काढण्यात आलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करून तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथ पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
सर्वसामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करीत आहे. सरकारला पुरेसा वेळ देऊनही सरकार वेळ काढूपणा करत आहे. उपोषणामुळे जर जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाला तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी. असे पत्राद्वारे अहमदनगरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला कळवले आहे.
त्यांना पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने बुधवारी (१४ फेब्रुवारी) संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत आहे, असे निवेदनहि देण्यात आले आहे.