१५ हजारांची लाच स्वीकारताना विद्युत निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील लाचखोरांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसून येत असून या अनुषंगाने पुन्हा एकदा अधिकार्‍याला एसीबीच्या पथकाने ट्रॅप केले आहे. उद्योग उर्जा व कामगार खात्यातील विद्युत निरिक्षकाला १५ हजारांची लाच घेताना २७ रोजी सायंकाळी एसीबीने रंगेहाथ अटक केली. गणेश नागो सुरळकर (५२, रा. पार्वती नगर) असे लाचखोराचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली.

या संदर्भातील माहिती अशी की, यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करीत असतात. त्यांच्याकडील परवानाचे नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी उद्योग उर्जा व कामगार खात्यात विद्युत निरिक्षक-वर्ग १ या पदावर कार्यरत असणारे गणेश नागो सुरळकर यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र त्यासाठी सुरळकर याने १५ हजारांची मागणी केली होती. मंगळवारी पंचा समक्ष लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

एसीबीचे उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, एन. एन. वाघ, सहाय्यक फौजदार दिनेशसिंह पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी या पथकाने लाच घेताना पकडले.