१ कोटींपेक्षा जास्त भगिनींना १७ तारखेपर्यंत पैसे मिळणार : देवेंद्र फडणवीस

नागपूर : येत्या १७ ऑगस्टपर्यंत १ कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये ध्वजारोहन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कालपासून लाडकी बहिण योजनेच्या निधी वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे. १७ तारखेपर्यंत १ कोटींपेक्षा जास्त लाडक्या भगिनींच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यानंतरही ज्यांचे फॉर्म येत आहेत. त्यावर प्रक्रिया सुरु असून त्यांच्यासुद्धा खात्यात निधी जमा करणार आहोत. भाऊबीजेच्या दिवशी आम्हाला आमच्या बहिणींना ओवाळणी देण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे,” असे ते म्हणाले.

तसेच भारत देश असाच विकसित होत राहो, भारताची लोकशाही अशीच मजबूत आणि प्रगल्भ होत राहो आणि आमचा तिरंगा झेंडा सातत्याने जगात फडकत राहो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी भारतवासीयांना दिल्यात.