२५ एप्रिलपर्यंत दाखल करता येईल उमेदवारास नामनिर्देशनपत्र

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील रावेर व जळगाव लोकसभा निवडणूकीसाठी १८ एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिध्द होणार आहे. या अधिसूचनेनुसार १८ ते २५ प्रिलपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. यानुसार इच्छूक उमेदवार त्यांचे उमेदवारी अर्ज सादर करतील. मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे उमेदवार शक्तीप्रदर्शन करून २० ते २५ एप्रिल रोजी अर्ज सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उबाठा शिवसेना व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवारही याच कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जळगाव व रावेर लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. त्यानुसार १८ एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना निघेल. १८ ते २५ एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. २६ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. २९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. १३ मे रोजी मतदान होईल. ४ जून रोजी मतमोजणी होईल. तर ६ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

६ जूननंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही संपुष्टात येईल. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने जळगाव लोकसभेसाठी करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विजयासाठी माजी खासदार व उबाठा गटात गेलेले उन्मेश पाटील हे प्रयत्नशिल आहेत. तर रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे गेली आहे. त्यांनी उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

रावेर तालुक्यात ठिंबकच्या उद्योगाच्या माध्यमातून श्रीराम पाटील याचा परिचय आहे. त्या जोरावर ते खासदारकीसाठी नशिब अजमावत आहेत. शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार मिळण्यापूर्वी ते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत होते. नंतर भाजपात गेले. त्यानंतर शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली. अपक्षही भरतील अर्ज राष्ट्रीय पक्षाकडून अपेक्षाभंग झालेले आणि विविध पक्षांतील इच्छूक उमेदवार १८ ते २२ एप्रिल या कालावधीत अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविली जात आहे