३ जून पासून डीएड साठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार ! ३ जून २०२४ पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार

जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डी.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, दि. ३ जून २०२४ पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी १७ विद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती. त्यातील तीन विद्यालयांमध्ये प्रवेश फेरीअखेर एकही जागा रिक्त शिल्लक नव्हती. मंजूर सर्व जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते.

प्रवेशासाठी इच्छूक असलेले कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील पात्र उमेदवार हे इयत्ता १२ वी खुल्या संवर्गात किमान ४९.५ टक्के व अन्य संवर्गात किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात जळगाव जिल्ह्यात १७ अध्यापक विद्यालयांनी नोंदणी केली होती. ९०० प्रवेश क्षमता उपलब्ध होती. त्यापैकी ५३३ जागांवर प्रवेश झाले होते. नवीन सत्रासाठी विद्यालयांची नोंदणी सुरू आहे. यामध्ये गेल्या वर्षाप्रमाणे विद्यालयांची संख्या कायम राहू शकते किंवा कमी होऊ शकते.

जुलैत वर्ष होणार सुरू…

सध्याच्या घोषित वेळापत्रकानुसार २०२४-२५ या शैक्षणिक सत्राच्या प्रथम वर्षाची सुरुवात १५ जुलैपासून होणार आहे.

या ठिकाणी भरा अर्ज…

विद्यार्थ्यांनी www.maa.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. प्रवेश नियमावली, अध्यापक विद्यालयांची यादी, वेळापत्रक व प्रवेशाबाबतच्या सूचना संकेतस्थळावरील इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन या टॅबमध्ये उपलब्ध असणार आहे. अर्ज भरताना स्वत:चा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.

असे आहे वेळापत्रक (शासकीय कोटा)…

– उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरणे – दि. ३ जून ते दि. १८ जून
– अर्जांची ऑनलाइन पडताळणी – दि. ३ जून ते दि. १९ जून
– गुणवत्ता यादीवरील हरकतींचे निरसन – दि. २४ जून
– पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध – दि. २६ जून
– प्रथम फेरी प्रवेशाची यादी – दि. २७ जून
– प्रथम फेरीतील उमेदवारांना प्रवेश – दि. २७ जून ते १ जुलै

डी.एड.साठी दि. ३ जूनपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. त्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामधील सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरावेत, अशी माहिती जळगाव डीएडचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी दिली.