७२ तासांत कुस्ती महासंघानं उत्तर द्यावं, सरकार ऍक्शन मोडवर

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खा. बृजभूषण सिंह अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत आहेत, असा आरोप केला आहे. या आरोपानंतर खा. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांनी आंदोलन केले आहे. दरम्यान, या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रीडा मंत्रालयाने कुस्तीगीर संघटनेला नोटीस पाठवून या आरोपांवर ७२ तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

सिंह यांना अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणी
आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी सिंह यांना अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

अनेक प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीपटूंचे शोषण होत असल्याचा दावा
लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरात अनेक प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीपटूंचे शोषण होत असल्याचा दावा महिला कुस्तीपटूंनी केला आहे. या कुस्तीपटूंनी आरोप केला आहे की शिबिरात काही महिला आहेत ज्या डब्ल्यूएफआय अध्यक्षांच्या सांगण्यावरून कुस्तीपटूंशी संपर्क साधतात. आरोप करणा-या महिला कुस्तीपटूने स्वत:ला अशा प्रकारच्या अत्याचाराचा सामना करावा लागला नाही असे म्हटले आहे.

परंतु, तिने असा दावा केला की, डब्ल्यूएफआय अध्यक्षांच्या सांगण्यावरून तिला त्यांच्या जवळच्या अधिका-यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. कारण तिने टोकियो ऑलिम्पिक खेळांनंतर झालेल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या मुद्याकडे लक्ष वेधून घेण्याचे धाडस केले होते.

या प्रकरणी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरू आहे. यावेळी आरोप करणारी महिला कुस्तीपटू म्हणाली, मी किमान १०-१२ महिला कुस्तीपटूंना ओळखते, ज्यांनी मला अध्यक्षांनी केलेल्या लैंगिक छळाबद्दल सांगितले आहे. त्यांनी मला सांगितले की, आम्ही याबाबतची तक्रार करू शकत नाही. परंतु, तुझ्यासमोर आमचे प्रश्न मांडत आहोत. मात्र, आमची नावे कोणाला सांगू नको. परंतु, मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटले तर निश्चितपणे अत्याचार झालेल्या महिला पैलवानांची तक्रार त्यांना सांगेन.

कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला..
टोकियो ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया या आंदोलना दरम्यान म्हणाला की, “महासंघ मनमानी पद्धतीने चालवला जात आहे. शिवाय जोपर्यंत WFI अध्यक्षांना पदावरून काढून टाकले जात नाही तोपर्यंत तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार नाही. बजरंग, विनेश, रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंद्र किन्हा आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेता सुमित मलिक या 30 कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले आहे.