जळगाव : रेल्वेत नोकरी करत असलेल्या तरुणाची १० लाख ७४ हजार १९४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या तरुणास वडिलांच्या नावे असलेली पॉलिसी परत करण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळातील तुळशीनगर येथे प्रसाद किशोर कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते रेल्वे विभागात कार्यरत आहेत. त्यांना ८ मार्च २०२४ रोजी भालचंद्र व रामचरण नाव सांगणाऱ्या दोघांनी मोबाईवर संपर्क साधात वडिलांच्या नावे असलेली पॉलिसीची रक्कम परत देतो असे सांगितले. यानुसार त्यांनी काही कागदपत्रेही पाठवली. यामुळे प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. कुलकर्णी यांच्याकडून वेगळ्या पद्धतीने ऑनलाइन स्वरूपात तब्बल १० लाख ७४ हजार १९४ रुपये स्वीकारले. मात्र, पॉलिसीची रक्कम परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी गुरुवार २० जून रोजी सायंकाळी जळगाव सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार भालचंद्र आणि रामचरण नाव सांगणारे अज्ञात दोन मोबाईलधारकांवर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.