‘उद्धव सेना’ महाप्रबोधन यात्रा मुद्यावरून गुद्यावर!

 

जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांचे जाती-जातीत तेढ निर्माण करणारे भाषण ‘मुद्यावरून गुद्यावर’ नेणारे ठरले असून त्याचे पडसाद आता जिल्हाभर उमटू लागल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या भाषणावर बंदी घालत गुरूवारी सायंकाळी त्यांना शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आले.

यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेच्या या गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शहर पोलीस स्टेशन गाठले.

युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना महाप्रबोधन यात्रेत भाषण करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली आहे. धरणगाव व पाचोरा येथील त्यांनी सामाजिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याने ही कारवाई प्रशासनाने केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. मंगळवारी धरणगाव व बुधवारी पाचोरा आणि एरंडोल येथेे सभा झाल्या. या सभांमध्ये सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या आमदारांवर प्रखर टीका करत जाती-जातीत तेढ निर्माण होईल असे भाषण केले. दरम्यान, त्यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी गुजर समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. यामुळे आज गुरूवारी चोपडा, उद्या शुक्रवारी मुक्ताईनगरातील शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत ते भाषण करू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पोलीस प्रशासनाने याबाबतची नोटीस आज गुरूवारी कोळी यांना जारी केली. जळगावात ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये नोटीस बजावण्यासाठी पोलीस दाखल झाले असता शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पालकमंत्र्यांविरोधात संताप

प्रशासनाकडून भाषण बंदीची नोटीस बजावल्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. यानंतर पोलिसांनी शरद कोळी यांना ताब्यात घेतले. त्यांना चालतच शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी घोषणा देत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधातही तीव्र घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

अधिकार्‍यांशी चर्चा

शहर पोलीस स्टेशनला पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा हे स्वत: अधिकार्‍यांसमवेत होते. याठिकाणी शिवसेना उद्धव गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत व अन्य पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करून आम्ही अटी पाळू शरद कोळींना भाषण करू देणार नाही असे सांगत त्यांची चोपडा सभेसाठी येऊ द्या अशी विनंती केली. ते भाषण करणार नाहीत किंवा माध्यमांशी संवाद साधणार नाही असे यावेळी सांगण्यात आल्यानंतर काही पोलीस बरोबर देऊन कोळी यांना चोपड्यासाठी रवाना करण्यात आले. रात्री शरद कोळी यांना पुन्हा पोलीस स्टेशनला आणले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या विरूद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.