कर्मचाऱ्यांना ‘ई-मेल’ कामावर येऊ नका!

 

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेताच आपली धोरणे जोरकसपणे राबवायला सुरुवात केली आहे. ट्विटर कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची बातमी ताजीच असताना आता अर्ध्याहून जास्त कर्मचाऱ्यांनाही कायमची रजा देण्याचे ठरवले आहे. शुक्रवारी सकाळचीच अनेक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक ई-मेल वर आजपासून आपल्याला कंपनीत येण्याची आवश्यकता नाही, घरी निघून जावे असा संदेश आला. त्यामुळे मस्क लवकरच ट्विटरचा जुना चेहरा पूर्णपणे बदलून आपली छाप असलेला नवा चेहरा देणार हे स्पष्ट झाले आहे.

एलॉन मस्कने ट्विटरची मालकी मिळवली आहे हे कळताच जवळपास ८ लाख ७७ हजार यूजर्सने ट्विटर सोडले आहे. यात अनेकांनी आता ट्विटरचे स्वरूप पूर्णपणे बाजारू कंपनी म्हणून होणार असल्याचे मत नोंदवले आहे. याउलट एलॉन मस्कचे ट्विटरवरील वैयक्तिक फॉलोअर्स मध्ये जबरदस्त वाढ झाली असून फक्त ६ महिन्यांत तब्बल २ कोटी ४६ लाख एवढे फॉलोवर्स वाढले आहेत त्यात गेल्या तीन महिन्यांतील फॉलोवर्स वाढीचा वेग सर्वाधिक आहे. जे कोणी एलॉन मस्कच्या नव्या रीतींच्या विरोधात आहेत त्यांच्यवर नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे हेच यातून सूचित होत आहे.

मस्कने ट्विटर आपल्या ताब्यात घेताच आता पर्यंतची सर्व कार्यशैली देखील बदलण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता ट्विटरवर ब्लू टिक साठीची फॉलोअर्स मर्यादा काढून टाकून आता महिन्याला ८ डॉलर्सपर्यंत रक्कम भरून ही ब्ल्यूटिक मिळवता येणार आहे. भारतीयांसाठी १५० ते २०० रुपये भरून ही ब्लू टिक मिळवता येणार आहे. त्यात कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासांमध्येही वाढ करण्यात आली असून आता १२ तास काम करावे लागणार आहे. लवकरच या सर्व गोष्टींचे परिणाम दिसायला लागतील आणि तेव्हा ट्विटरची पूर्वीचीच प्रतिमा राहील का? असा प्रश्न आहे.