आजपासून दहावीच्या परीक्षांना सुरवात

तरुण भारत लाईव्ह ।०२ मार्च २०२३। आजपासून राज्यातील दहावीची परीक्षा सुरु होत आहे. राज्यातून यंदा एकूण 15.77 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून ही परीक्षा 533 परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना गुरुवार, 2 मार्च 2023 पासून सुरूवात होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळात मार्च 2023 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) ची लेखी परीक्षा गुरुवार, दिनांक 2 मार्च 2023 ते शनिवार दिनांक 25 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण 15,70,256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये आठ लाख 44 हजार 116 विद्यार्थी, तर 7 लाख 33 हजार 67 विद्यार्थिनी आहेत.

विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे तर दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचं आहे. हॉल तिकीटवर देखील वेळापत्रक नमूद केलेलं आहे. परीक्षा निकोप, भयमुक्त आणि फॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. तथापि पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.