सिडनी : ग्रहमालिकेत असलेल्या शनि ग्रहाच्या कक्षेत फिरणाऱ्या १२८ नव्या चंद्रांना शोधण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे. या शोधामुळे शनिभोवती एकूण २७४ नैसर्गिक उपग्रह असल्याचे स्पष्ट झाले. सौरमालेतील इतर सर्व ग्रहांच्या चंद्रांची एकत्रित संख्या याच्या निम्मीही नाही. या शोधामुळे शनिची ‘चंद्रांचा राजा’ म्हणून असलेली प्रतिष्ठा आणखी बळकट झाली आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने तैवानमधील ॲकॅडेमिया सिनिका येथील एडवर्ड ॲश्टन यांच्या नेतृत्वातील शास्त्रज्ञांच्या पथकाच्या या शोधाला मान्यता दिल्याने शनीला तब्बल १२८ नवीन चंद्र मिळाल्याचे स्पष्ट झाले.
खगोलशास्त्रज्ञ एडवर्ड ॲश्टन यांनी सांगितले की, मागील आठवड्यात आयएयू अर्थात् आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने नव्या चंद्रांची अधिकृत नोंदणी केली आहे. संशोधकांनी १० मार्च रोजी अर अरक्झीव्ह या जर्नलमध्ये आपला अभ्यास प्रसिद्ध केला; मात्र तो अद्याप समीक्षण प्रक्रियेत आहे. नव्या शोधामुळे शनी हा गुरू ग्रहाच्या ९५ चंद्रांपेक्षा खूपच पुढे गेला आहे. आमच्या काळजीपूर्वक आखलेल्या बहुवर्षीय मोहिमेमुळे आम्हाला नव्या चंद्रांचा मोठा साठा मिळाला, ज्यामुळे शनीच्या अनियमित उपग्रहांच्या उत्क्रांतीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. हे नवे चंद्र ‘नॉर्स गटातील’ आहेत, जे शनी ग्रहाच्या कक्षेत वक्राकार आणि विरुद्ध दिशेने अर्थात् रेट्रोग्रेड फिरतात. हे अनियमित चंद्र लहान आकाराचे फक्त एक-दोन मैल व्यासाचे आणि अपूर्ण गोलसर आहेत.
१० कोटी वर्षांपूर्वी निर्मिती
वैज्ञानिकांच्या मते, हे चंद्र पूर्वीच्या मोठ्या चंद्रांचे तुकडे असावेत, जे कोणत्या तरी महाकाय धडकेमुळे फुटले असतील. ही धडक १० कोटी वर्षांपूर्वीच घडली असण्याची शक्यता असून, यातूनच शनिभोवती फिरणाऱ्या चंद्रांची निर्मिती झाली. हा अपघात शनि ग्रहाच्या इतर चंद्रांशी किंवा एखाद्या उत्केशी झाला असावा. सौर मंडळातील इतर ग्रहांच्या तुलनेत शनिच्या कक्षेत सर्वाधिक चंद्र असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.