१३ लाख कोटींचे लग्नसोहळे

 लग्नसोहळ्यांकडे सामाजिक इव्हेंट म्हणून बघितले जाते. पूर्वी लग्न सोहळ्याची तयारी वर्षभरापासून केली जात होती. अगदी बारीक-सारीक गोष्टी नमूद करून वधूपक्ष डोळ्यात तेल घालून या लग्न सोहळ्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत. पूर्वी लग्न सोहळ्यात अनेक अडचणी यायच्या, वर-वधू पक्षातील लोकांच्या मानपानापासून तर त्यांच्या जेवणाची, येण्याजाण्याची संपूर्ण व्यवस्था करताना बिचा-या वधुपित्याची तारांबळ उडायची.  म्हणूनच ‘लग्न पाहावे करून’ ही म्हण अस्तित्वात आली. मात्र, आता विवाह सोहळ्यांबाबतीत समाजाचे चित्र जरा उलटे झाले आहे. लग्नाचा इव्हेंट झाला आणि सारेच काही बदलले. लगीन हंगामाचा यंदाचा शेवटचा टप्पा सुरू असून आतापर्यंत देशात ७० लाख लग्न पार पडली आहेत. या लग्नापोटी १३ लाख कोटींचा खर्च झाला आहे. जानेवारी ते जून दरम्यान पार पडलेल्या ४९ लग्न तिथींवर ७० लाख लग्न लागले आणि त्या लग्नापोटी खर्च झालेल्या १३ लाख कोटींपैकी ८० टक्के रक्कम ही थेट बाजारपेठेत आली.
वर-वधू पक्ष बाजारात आला आणि एका लग्नामागे कमीत कमी ४०० ते ५०० लोकांना रोजगारही मिळाला. लग्नात होणा-या अशा अवाढव्य खर्चाचा नक्कीच प्रत्येकाने विचार करावा अशी वेळ आता आली आहे. यावर्षी जानेवारीमध्ये ९, फेब्रुवारी १३, मार्च ६, मे १३ तर जूनमध्ये ११ अशा एकूण ५२ लग्नतिथी होत्या. त्यापैकी ४९ लग्नतिथी संपल्या असून आता जूनमध्ये २३, २६ आणि २७ या मुख्य लग्नतिथी शिल्लक आहेत. प्रत्येक लग्नात कमी-जास्त प्रमाणात का होईना; मात्र उधळपट्टी झालेलीच आहे.  काही गरिबांची लग्नसोहळे सोडली तर इतरांनी वाजवीपेक्षा अधिकचा खर्च या लग्न सोहळ्यांवर झाला आहे. व्यापाèयांची शिखर संघटना कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने लग्न आणि लग्नावर झालेली आकडेवारी पुढे आणली आहे. ‘होऊ दे खर्च’ म्हणत लग्नांवर कोट्यवधी रुपये उधळले गेले आहेत. ७० लाख लग्नांपैकी ४० ते ५० टक्के लग्न हे ग्रामीण भागात झाले आहेत. मात्र, शहरी भागात झालेल्या लग्नात आमंत्रण कमी लोकांना द्यायचे, पण खर्च दणक्यात करायचे, असेच सूत्र अवलंबिले असल्याचे दिसून येते.  या लग्नांपैकी २० टक्के लोकांनी तर डेस्टिनेशन वेडिंग केले असून २ टक्के लोकांनी विदेशात लग्न पार पाडले आहे. सध्या भारतात ‘डेस्टिनेशन वेडिंग’ हा ट्रेंड समाजात रुजत आहे.
पूर्वी बहुतांशी लग्न वधूपित्याच्या मांडवात होत होती. काही अडचण असेल तरच वधूपित्याच्या गावी किंवा मधला मार्ग म्हणून जवळच्या एखाद्या ठिकाणी तेही केवळ सोय म्हणून लग्न उरकली जात होती. मात्र, आता डेस्टिनेशन वेडिंगचे फॅड ग्रामीण भागापर्यंतही पोहोचू लागले आहे. वधूकडची मंडळी आणि वराकडची मंडळी कारण नसताना आपल्या गावापासून दूर कुठेतरी भलत्याच ठिकाणी विवाह सोहळा उरकून घेतात; यालाच डेस्टिनेशन वेडिंग म्हणतात. असो; प्रत्येकाची लग्न करण्याची त-हा वेगवेगळी असते. मुद्दा लग्न सोहळ्याचा नाहीच आहे. मात्र, मूळ मुद्दा आहे सोहळ्याच्या नावाने होणा-या अनाठायी खर्चाचा! एका लग्नात मंगल कार्यालय, पत्रिका, कापड व्यापारी, कॅटरिंग, ट्रॅव्हल्स एजंसी, घोडेवाला, फोटोग्राफर, मिठाईवाला, फुलवारीवाला, बँड, वाजंत्री, मेहंदी, बांगड्यावाले याशिवाय इतरही अनेक लोकांना लग्न सोहळ्यामुळे हंगामी रोजगार मिळतो. हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने हिताचेच आहे. कारण या सोहळ्यातून अनेकांच्या घरचा खर्च चालतो.
मात्र, कुठेतरी या सोहळ्यांमध्ये ‘होऊ दे खर्च’ म्हणत केला जाणारा अवाजवी खर्च नक्कीच टाळण्याची गरज आहे.  लग्न समारंभांमध्ये जेवणावळीवर होणारा खर्च विचारात घेण्यासारखा आहे. काही लग्नांमध्ये मेनू तर मोजताच येत नाही. पत, प्रतिष्ठा, पद याशिवाय ‘लोक काय म्हणतील?’ असा विचार करीत खर्चाला वाट मोकळी करून दिली जाते. लग्नाकडे भावनिक सोहळा म्हणून बघितले जाते. या सोहळ्यात कुणी दुखावू नये म्हणून भावना जपण्याच्या नादात अनाठायी खर्च होतोच होतो. कित्येकदा लग्न समारंभातील लाखो टन अन्न वाया घालविले जाते. कुणाच्याही पोटात न जाता ते अन्न गटारं, नद्यांमध्ये फेकून दिले जाते. ज्या अन्नासाठी माणसं वणवण भटकतात ते अन्न गरजू व्यक्तीच्या पोटापर्यंत पोहोचत नाही. शाही लग्नाचा घाट घालणा-यांनी लग्न सोहळे थाटात करावे, कुणाचे काहीही म्हणणे नाही. Indian wedding मात्र, नको तिथे होणारा खर्च आणि अन्नाची होणारी नासाडी टाळण्याची गरज आहे. लग्न एकदाच होते म्हणत होणारी उधळपट्टी थांबायला हवी की नको, याचाही विचार समाजाने करण्याची गरज आहे.