जळगाव : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांकडून 27 प्रस्ताव मदत अनुदानासाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी 13 प्रस्ताव पात्र ठरले असून 14 प्रस्ताव अपात्र असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत विनायक पांडुरंग बाविस्कर, पुनगाव, ता. चोपडा, राहुल अंबादास पाटील, बोरखेडा, बाळू लहू कोळी, वाकटुकी, महेंद्र शांताराम माळी, रा.धरणगाव, ता. धरणगाव, सुदाम मन्साराम उगले, ढालसिंगी, विनोद हिंमत दांडगे, तोंडापूर, प्रल्हाद राजेंद्र सटाले, सारगाव, ता.जामनेर, गोपाळ रामचंद्र चौधरी साळशिंगी, सुशील भीमराव सुरवाडे जलचक्र, खुर्द. ता. बोदवड, नेत्रपाल ईश्वर पाटील जवखेडे, ता. अमळनेर, दत्तू लक्ष्मण पाटील तमगव्हाण, ता.चाळीसगाव, प्रकाश रमेश ठाकरे (कोळी) निपाणे, किरण मन्साराम मराठे टोळी, ता. एरंडोल असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे 13 प्रस्ताव समितीने पात्र ठरवले आहेत. तर 14 प्रकरणे अपात्र असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे प्रतिनिधी, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी आणि अन्य समिती सदस्य उपस्थित होते.