यावल : तालुक्यातील एका गावातून मोटारसायकल चोरीला गेली होती. या प्रकरणात शिरपूर येथून यावल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोघे ही मध्यप्रदेशातील रहिवासी असून त्यांच्याकडून चोरी केलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली. दोघांना यावल न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असून संशयीताची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.
यावल तालुक्यातील गिरडगाव येथील प्रशांत भीमराव पाटील यांची विना क्रमांकाची मोटरसायकल सोमवार १७ जून रोजी चोरी गेली होती. याप्रकरणी १९ जून रोजी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन, सचिन पाटील, हरीश वेताळ, राहुल केदारे यांनी केला. या पोलीस पथकाने शिरपूर येथून गुन्ह्यातील संशयित आरोपी राजेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला (३६) व ईश्वरसिंग नुरबीनसिंग चावला (२३, दोघे रा. उमर्टी, ता.वरला, जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांना अटक केली. या दोघांनी मोटरसायकल चोरी करून भुसावळात बेवारस सोडली. ती बेवारस मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली असून दोघांना मंगळवारी यावल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रथमवर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांनी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयीतांची रवानगी धुळे कारागृहात करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश महाजन करीत आहे.