जळगाव : सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पाल येथील हरिण पैदास केंद्रात चाऱ्यातून विषबाधा झाल्याने चार दिवसांत १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली असून, मृत हरणांमध्ये पचनशक्ती क्षीण होणे आणि घटसर्पाची (HS) लक्षणेही आढळून आली आहेत.
६ फेब्रुवारी रोजी पहिल्या मृत हरणांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर, एकाच दिवशी सहा हरणांचा मृत्यू झाला. पुढील दिवशी मृत्यूची संख्या वाढतच गेली आणि चौथ्या दिवशी आणखी दोन हरणे दगावली. यामुळे एकूण मृत हरणांची संख्या १४ वर पोहोचली.
हरिणांच्या मृत्यूनंतर तत्काळ शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर हरणांच्या शरीरातील अवयव (व्हिसेरा), त्यांना दिलेला चारा आणि पाणी यांचे नमुने पुणे येथील शासकीय पशुरोग चिकित्सा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्राण्यांना विषबाधा झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हरिणांच्या मृत्यूची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने सुरू केलेल्या औषधोपचारांमुळे सात हरणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास करून नेमके कारण शोधण्याची मागणी आता वन्यजीव प्रेमी आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून केली जात आहे.
पुढील तपास सुरू
पाल येथील हरिण पैदास केंद्र हे सातपुड्यातील महत्त्वाचे प्रकल्पांपैकी एक असून, येथे वन्यजीव संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. मात्र, या घटनेनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. तपास अहवाल आल्यानंतरच या हरणांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.