जळगाव जिल्ह्यातून दूध अनुदानासाठी १४ प्रस्ताव दाखल

जळगाव : गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात गाईच्या दूध दरात मोठी घसरण झाली होती. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावरून दूध उत्पादक संस्थां कडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. जानेवारी ते मार्चमधील अनुदानासाठी जिल्ह्यातून १ खासगी व १ सहकारी असे दोनच दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. आता त्यात १ सहकारी व ८ खासगी अशा संस्थांची भर पडली असून जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्याने १४ युजर आयडी प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास कार्यालय प्रशासनाने दिली.

गेल्यावर्षी दूध खरेदी दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. शासन स्तरावरून गायीचे दूध खरेदी दर ३४ रूपये प्रतिलिटर बंधनकारक करण्यात आला होता. परंतु, खासगी आणि सहकारी संघाकडून सरसकट २६ ते २७ रुपये प्रति लिटर दूधाचा दर दिला जात असल्याने दूधदराच्या या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी विविध शेतकरी संघटनांकडून सातत्याने आंदोलने करण्यात आली. यानंतर गत वर्षी हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा विरोधी पक्षाकडून उचलून घेण्यात आला होता. त्यानुसार दूध उत्पादक व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा दुग्धविकास मंत्री विखे-पाटील यांनी केली होती.

५ हजार ८९६ शेतकऱ्यांना २ कोटी ९४ लाख अनुदान वितरण
जिल्हा दूध संघ तसेच स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून संस्थात्मक अनुदान प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार जानेवारी ते १० मार्च या कालावधीत दिलेल्या अनुदानासाठी जिल्ह्यातून १७ हजार ६३४ पशुधनाची नोंदणी नुसार ५ हजार ८९६ शेतकऱ्यांचे ६० लाख ९७ हजार ६३४ लिटर दूध अनुदानासाठी नोंद केली होती. यात जिल्हा दूध उत्पादक संघ आणि अमर डेअरी बोदवड एक खासगी अशा दोन दूध संस्थांचे प्रस्ताव आले होते. त्या संस्थांनी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार यात २ कोटी ९४ लाख ३६ हजार १५ रूपये दूध अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

दूध अनुदान रकम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर
राज्य शासनाने जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी प्रति लीटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन अनुदान लाभासाठी जिल्ह्यातील ८ खासगी व १ सहकारी अशा ९ दूध संस्थांचे प्रस्ताव तसेच १४ युजर आयडी अनुदानासाठी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. विशेषता या निर्णयाचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. यापूर्वी जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना बोनस जिल्हा दूध संघ वा स्थानिक दूध उत्पादक सोसायट्यांमार्फत दिला जात होता. परंतु राज्यात दूध अनुदान रकम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनस्तरावयन प्रथमच जमा होत आहे.
– योगश नागरे, जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी,जळगाव

जिल्हास्तरीय समितीमार्फत पडताळणी
जिल्ह्यातील विकास दूध संघ व अमर डेअरी मार्फत डेअरी विभागाच्या पोर्टलवर गाईच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अपलोड केल्यावर जिल्हास्तरीय समिती मध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा दुग्धविकास अधिकारी व जिल्हा निबंधक सहकार यांच्या समितीमार्फत पडताळणी केल्यावर राज्यस्तरीय कमिटीकडे अनुदानासाठी अनुदानाच्या मान्यतेसाठी ऑनलाईन सादर करण्यात येते. अशा प्रकारे जिल्ह्यातील बहुतांश पशुपालकांची माहिती भारत पशुधन वर अद्यावत करून पाच रुपये प्रति लिटर अनुदान पशुपालकांना देण्यात येत आहे
-डॉ. श्यामकांत पाटील, उप आयुक्त, पशुसंवर्धन विभाग. जिल्हा परिषद जळगाव