पाटना : बिहारमधील छपरामध्ये एका १४ वर्षीय मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे नाव मुस्कान असे आहे. या हत्येचा आरोप शेजारी राहणारा शिबू अली आणि त्याच्या कुटुंबावर करण्यात आला आहे.
मुस्कानच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, शिबू आणि त्याचे कुटुंबीय त्यांच्यावर मुलीच्या लग्नासाठी दबाव आणत होते. त्यानंतर शिबूला मुलीने नकार दिल्यावर त्यानं तिला फासावर लटकवून ठार मारले. दरम्यान पीडित मुलगी आणि शिबू अली यांच्यात भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधाचे असल्याचे सांगितले जात आहे. हे प्रकरण छपराच्या मरहौरा पोलीस स्टेशन हद्दीतील जदौली बथना गावाशी संबंधित आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, शिबू अलीचे मुस्कानवर एकतर्फी प्रेम होते. यामुळे शिबूचे कुटुंबीय त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते. पण मुस्कानचे शिबूसोबत लग्न करायला ते तयार नव्हते. यामुळे संतापलेल्या शिबू आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुस्कानची हत्या केली.
मुस्कानची आई अजमेरी खातून यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या दि. ९ जुलै रोजी सायंकाळी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी अल्पवयीन मुलगी घरातच होती. मात्र जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा शेजारी निजामुद्दीन, घियासुद्दीन, अवदा खातून घरातून बाहेर पडताना तिला दिसले. त्यावेळी पीडितेच्या आईने त्यांना घरात येण्याचे कारण विचारले असता ते लोक उत्तर न देता निघून गेले.
यानंतर अजमेरी घरात गेल्या असता त्यांची मुलगी त्यांना मृतावस्थेत आढळली. गोंधळ सुरू असताना आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र मुख्य आरोपी शिबू अली घटनास्थळावरून पळून गेला. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. यासोबतच शिबू अली, निजामुद्दीन, घियासुद्दीन आणि अवदा खातून यांच्यावर गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.