---Advertisement---
जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी सर्वात मोठा गिरणा प्रकल्पाचा जलसाठा गुरूवार पहाटेच्या सुमारास सहाव्यांदा पूर्णत्वाकडे पोचला आहे. प्रकल्प क्षमता 582.014 मीटर असून सद्यस्थितीत 503.292 दशलक्ष घनमीटर अर्थात 96 टक्केपर्यंत पाणीपातळी पोचली आहे. परिणामी प्रकल्प सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून गुरूवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून 2500 क्यूसेक प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
सलग सहाव्यांदा प्रकल्प पूर्णत्वाकडे
जिल्ह्यात गिरणा हतनूर आणि वाघूर असे तीन मोठे प्रकल्प असून जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेला सर्वात मोठा गिरणा प्रकल्पाची क्षमता 523.55 दशलक्ष घनमीटर अर्थात 18.487 टिएमसी अशी आहे. सद्यस्थितीत प्रकल्प पाणीपातळी 503.292 दशलक्ष घनमीटर अर्थात 96 टक्के झाली असून 2019 नंतर 2023 वगळता आतापर्यंत सलग सहाव्यांदा पूर्णपणे भरला आहे. 2500 क्यूसेक पाण्याची आवक गेल्या 24 तासात प्रकल्प पाणलोट क्षेत्रात 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गिरणा नदी उगम व पाणलोट क्षेत्रात नाशिक जिल्ह्यात चणकापूर, अर्जूनसागर (उपनदी -पुनद), ठेंगोडा बंधारा, हरणबारी, नाकासाक्या, केळझर माणिकपुंज आदी उपनदी प्रकल्पातून 2500 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.
आवकेनुसार विसर्ग वाढण्याची शक्यता
जिल्ह्यातील सर्वात मोठा गिरणा प्रकल्पात 96 टक्के पाणीसाठा झालेला आहे. प्रकल्पात पाण्याची आवक पाहता गिरणा प्रकल्पातून दुपारी 1 वाजता प्रकल्पाचा दरवाजा उघडून नदीपात्रात 1000 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला आहे. सद्यास्थितीत गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रातून जवळपास 2500 क्युसेक्स आवक होत आहे. गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येईल.
सतर्कतेचा इशारा
- त्यामुळे गिरणा नदीकाठावरील नागरिकांनी पशुधन, चीज वस्तू, शेती मोटार पंप सुरक्षितेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. याशिवाय नदीपात्रात विविध विभागांची बांधकामे सुरू असून संबंधीत विभागांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. संबधीत विभागांनी त्यांचे बांधकाम साधने, साहित्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. योग्य ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी.
विनोद पाटील, कार्यकारी अभियंता. गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव
हतनूरचे 16 दरवाजे उघडले
हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून प्रकल्पात 231.19 दशलक्ष घनमीटर अर्थात 8.16 टिएमसी पाण्याची आवक झाली आहे. आवक लक्षात घेता प्रकल्पाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडून सांडव्यावरून 95हजार 32 तर उजव्या कालव्यातून 300 असा 95हजार 332 क्यूसेक प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
वाघूर पाणीपातळी 87 टक्क्यांवर
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 8 मिलीमीटर पाऊस झाला असून प्रकल्प पाणीपातळी 214.779 दशलक्ष घनमीटर अर्थात 7.58 टिएमसीनुसार 87 टक्के पर्यंत जलसाठा आहे.
लघू मध्यम प्रकल्पातून देखील विसर्ग
जिल्ह्यातील गिरणा 96, हतनूर 42.75, आणि वाघूर 87, टक्के तसेच 14 मध्यम आणि 96 लघू प्रकल्पापैकी अभोरा, मंगरूळ, सुकी, तोंडापूर, अंजनी, बोरी आणि मन्याड असे सात मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तसेच मोर 85.83, अग्नावती 40.61, हिवरा 88.13, बहुळा 90, गुळ 64.54, भोकरबारी 22.57, शेळगाव 6.42 टक्के असा एकूण 70.89 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पापैकी अभोरा 43.44, मंगरूळ 68.86, सुकी 348.35, तोंडापूर 6.92, अंजनी प्रकल्पाचे 2दरवाजे .01मीटरने आणि 1 दरवाजा 0.02 मीटरने उघडून 140 क्यूसेक, बोरी प्रकल्पाचे 2 दरवाजे अनुक्रमे 0.030 व 1.5 मीटरने उघडून 1354 क्यूसेक तर शेळगाव बॅरेजचे 15 दरवाजे 2मीटरने उघडून 62हजार 195 क्यूसेक असा विसर्ग विविध प्रकल्पांमधून केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
धुळे जिल्ह्यातील पाच प्रकल्प ओव्हरफ्लो
धुळे जिल्ह्यात 14 मध्यम आणि 45 लघू प्रकल्पांपैकी पाच मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यात पांझरा प्रकल्पातून 1300, मालनगाव प्रकल्पातून 285, जामखेडी 148.23, करवंद 325.78, अनेर प्रकल्पाचे 2 दरवाजे 0.75मीटरने उघडून 3080, तर अक्कलपाडा प्रकल्पाचे 2 दरवाजे 3 मीटरने उघडून 1338 क्यूसेक, आणि सुलवाडे आणि सारंगखेडा बॅरेजचे प्रत्येकी 6 दरवाजे पूर्ण उघडून अनुक्रमे 88हजार 995 आणि 1 लाख 13हजार 206 क्यूसेक असा 95 हजार क्यूसेकचा विसर्ग केला जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील 4 प्रकल्प ओव्हरफ्लो, 3 लाख क्यूसेकचा विसर्ग
नंदुरबार जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्पापैकी रंगावली दरा, कोरडी आणि देहली असे चार प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या प्रकल्पापैकी रंगावलीतून 419, सारंगखेडा बॅरेजचे 6 दरवाजे पूर्ण उघडून 1 लाख 13हजार 206, प्रकाशा बॅरेजचे 7 दरवाजे पूर्ण उघडून 99हजार 677 असा एकूण 3 लाख 8 हजार 774 क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रात केला जात असल्याचे नंदुरबार जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.