---Advertisement---
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरपाडा येथे १६ वर्षीय मुलीला विषारी औषध पाजून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ जुलैला रात्री ही घटना घडली असून, उपचारादरम्यान १३ जुलैला तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृताचे नातेवाईक संशयितांविरुद्ध फिर्याद देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर सरकारतर्फे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित मुलगी (वय १६) ही गेल्या तीन महिन्यांपासून राहुल वसावे (रा. कोहनापाडा, ता. अक्कलकुवा) याच्यासोबत घर सोडून गेली होती. ९ जुलैला सकाळी राहुल वसावे याने तिला तिच्या घरी आणून सोडले. पुन्हा संशयिताच्या घरी येऊ नये, या कारणावरून त्याच रात्री दहाच्या सुमारास राहुल वसावे, दिलीप कृपालसिंग चोरे, दिलवरसिंग वसावे, नकट्या वसावे, विनोद वीरजी आणि मिथुन वसावे यांनी पीडितेच्या घरात घुसून तिला विषारी औषध पाजले. पीडित मुलीने मोलगी ग्रामीण रुग्णालयात दिलेल्या जबाबामध्ये ही माहिती दिली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी नंदुरबार येथील निम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे १३ जुलैला तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी संशयित दिलीप चोरे (वय ४२, रा. नेन मोलगी), दिलवरसिंग वसावे, नकठ्या पारशी वसावे, विनोद यसाव वीरजी आणि मिथुन काला वसावे (सर्व रा. कोहनापाडा, ता. अक्कलकुवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक विश्वास पावरा तपास करत आहेत.