---Advertisement---

धक्कादायक ! चार महिन्यांपूर्वीच मिळाली नोकरी अन् अपघातात संपले नव्या भविष्याची स्वप्ने, १९ वर्षीय पोस्टमास्तरचा दुर्दैवी मृत्यू

by team
---Advertisement---

धडगाव येथील पोस्ट कार्यालयात अवघ्या चार महिन्यांपूर्वीच नोकरीस लागलेल्या युवकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १६) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. समोरून आलेल्या एसटी बसने अचानक हुलकावणी दिल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला.

बसच्या कटामुळे नियंत्रण सुटले

सागर अरुण वाघ (वय १९, रा. तामसवाडी, ता. साक्री, जि. धुळे) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सागर वाघ हा आपल्या सहकारी धनंजय फोलाणे यांच्यासोबत एमएच २६ बीझेड २८०४ क्रमांकाच्या दुचाकीने रोहजरीपाडा येथून धडगावकडे निघाला होता. खामला गावाजवळ अचानक समोरून आलेल्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी  रस्त्यावर घसरली आणि अपघात घडला.

या अपघातात सागर वाघ आणि धनंजय फोलाणे दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, सागर वाघ यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी धनंजय तानाजी फोलाणे यांनी धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात एसटी बसचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, अपघातास जबाबदार असलेल्या बसचालकाचा शोध घेतला जात आहे.

चार महिन्यांपूर्वीच झाली होती पोस्ट खात्यात निवड

सागर वाघ हा तामसवाडी (ता. साक्री) येथील रहिवासी होता. साधारण कुटुंबात जन्मलेला सागर अभ्यासात हुशार होता आणि त्याने स्पर्धा परीक्षेतून भारतीय टपाल सेवेत यश मिळवले होते. अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्याची पोस्ट खात्यात निवड झाली होती आणि त्याला धडगाव येथे पोस्टमास्तर म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

गावातीलच लाकूडकाम करणारे अरुण वाघ हे त्याचे वडील असून, त्याला एक मोठा भाऊ आणि एक बहीण आहे. घरातील सर्वात लहान आणि कुटुंबाची आशा असलेल्या सागरच्या अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

सागर वाघच्या अपघाती मृत्यूची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण तामसवाडी गाव शोकसागरात बुडाला. चार महिन्यांपूर्वी ज्याचा सत्कार करण्यात आला होता, तोच युवक असे अचानक काळाच्या पडद्याआड जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवारावर मोठा आघात झाला आहे.

शुक्रवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात तामसवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अंतिम यात्रेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. सागरच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment