जळगाव : एका 19 वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. समर्थ कॉलनी येथे सोमवार, २३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चंदा महेश राठोड (वय १९, रा. समर्थ कॉलनी, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. चंदा ही अभ्यासात हुशार होती. ती नीट परीक्षादेखील उत्तीर्ण झाली असल्याचे तिच्या नातेवाईकांनी माहिती दिली. तिचे वडील महेश हे वॉचमनचे काम करतात. ती आई, वडील, २ बहिणी यांच्यासह राहत होती.
दरम्यान, सोमवार, २३ रोजी घरी कोणी नसताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरी चंदाने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. काही कालावधीनंतर तिच्या कुटुंबातील घरी परत आले. यावेळी धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. चंदाने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.