लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावरून काँग्रेससह संपूर्ण विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभाजनासाठी थेट काँग्रेसला जबाबदार धरले आहे. फाळणीसारखी घटना पुन्हा होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. काँग्रेस केवळ व्होट बँकेची चिंता करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शेजारी देश पाकिस्तानवरही त्यांनी मोठा दावा केला आणि पाकिस्तान विलीन होईल नाहीतर नष्ट होईल असे म्हटले आहे.
वास्तविक, मुख्यमंत्री योगी फाळणीच्या भीषण स्मृती दिनानिमित्त एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लखनऊच्या हजरतगंज येथे पोहोचले. तेथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी बांगलादेशात घडलेल्या घटनांची 1947 शी तुलना केली. ते म्हणाले की, 1947 मध्ये जे काही घडले होते, तेच दृश्य आज बांगलादेशात पाहायला मिळत आहे. बांगलादेशात हिंदू आपल्या जीवाची याचना करत आहेत. बांगलादेशात हिंदूंवर जे काही चालले आहे त्यावर संपूर्ण जग मौन बाळगून आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, ‘भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकही गप्प आहेत, ते एक शब्दही बोलत नाहीत कारण त्यांना भीती आहे की जर ते कमकुवत लोकांच्या बाजूने बोलले तर त्यांच्या व्होट बँकेवर परिणाम होईल. विरोधक जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. फाळणीच्या शोकांतिकेबद्दल काँग्रेसने कधीही देशाची माफी मागितली नाही. काँग्रेस नेहमीच देशाची गळचेपी करत आली आहे. 1947 मध्ये बांगलादेशात हिंदूंची संख्या 22 टक्के होती, ती आज केवळ 7 टक्के झाली आहे.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून, स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी विभाजन स्मृती दिन साजरा केला जातो. यावेळी फाळणी विभिषिका स्मारक मूकमोर्चाही काढण्यात आला. या पदयात्रेत मुख्यमंत्री योगी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, महापौर सुषमा खरकवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री योगी हातात फलक घेऊन फिरत होते. त्यानंतर त्यांनी फाळणीच्या भीषण घटनेवर आधारित प्रदर्शनाला भेट दिली.