जिल्ह्यात रब्बीसाठी १ लाख १४ हजार मे.टन खत साठा उपलब्ध

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रब्बीसाठी यंदा हरभर्‍याचा पेरा वाढणार असून त्यात गहू, ज्वारी, मका, भुईमूग आदी पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे. शेतकर्‍यांना बियाणे पेरणी काळात खताचीही आवश्यकता भासते. त्यासाठी जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १ लाख १४ हजार मेट्रीक टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यात युरीया ४२ हजार मे.टन., डी.ए.पी. ६ हजार ४०० मे.टन, एमओपी ५ हजार ७०० मे.टन तर एनपीके ३५ हजार ७०० मे.टन , एस.एस.पी. २२ हजार ७०० मे.टन रासायनिक खत साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी यंदाच्या रब्बी हंभागातील पीकाच्या पेरणीस सुरूवात केली आहे. रब्बी हंगामातील बियाण्यांची पेरणी करताना सोबतच रासायनिक खते शेतकरी पीकाची वाढ जोमाने वाढण्यासाठी देत असतात. त्यामुळे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकर्‍यांकडून या खतांची मात्र क्षेत्रानुसार दिली जाते.

जिल्ह्यात यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्याने रब्बीचे उत्पादन वाढणार आहे. मात्र खरिप हंगामात परतीच्या पावसाने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हजेरी लावल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कापूस, केळी या पीकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात उत्पादन घेण्यासाठी तयारी केली आहे. खरिपाने मारले मात्र रब्बी तारणार अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. त्यासाठी शेतकर्‍यांकडून बियाण्यांसह खतांची मागणी वाढली आहे. खते मुबलक उपलब्ध असल्याने शेतकर्‍यांनी त्याची आवश्यकतेनुसार खरेदी करण्याचे आवाहन जि.प.चे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी केले आहे.

महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांनाअर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचति जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी टॅक्ट्रर, टॅक्ट्रर चलित औजारे, (रोटाव्हेटर, नांगर, सीड ड्रील) काढणी पश्‍चात औजारे (थे्रशर, हार्वेस्टर, मनुष्यचलित औजारे, पीक संरक्षण औजारे(स्प्रेयर), दाल मिल इ.औजारांचा लाभ घेण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. महाडीबीटी पोर्टलचे संकेत स्थळ हींींिी://ारहरवलींारहरळीं.र्सेीं.ळप हे असून तरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र या माध्यमातून संकेत स्थळावर अर्ज करू शकतात. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय कृषी अधिकारी वैभव शिंदे यांनी केले आहे.