सीसीटीव्हीवरून उलगडा : पावणे तीन लाखांची घरफोडी आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ:  शहरातील गुंजाळ कॉलनीतील वयोवृद्धाचे घर बंद असत्याची संधी चोरट्यांनी साधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा मिळून दोन लाख ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना रविवार, २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली होती. बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने सीसीटीव्ही तसेच गोपनीय माहितीवरून आरोपी निष्पन्न करीत त्यास अटक केली आहे. जावेद शेख शकील (२५, रामदासवाडी, खडका रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेनंतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

असे आहे चोरी प्रकरण

गुंजाळ कॉलनीत रामप्रसाद गोपाल चंदन (६६, रा. गुंजाळ कॉलनी, भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शनिवार, २७ जुलै रोजी रात्री १० ते रविवार, २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान चंदन परिवार बाहेरगावी असल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली होती. घराच्या कंपाउंड गेटचे आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश करीत कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने व रोकड मिळून एकूण दोन लाख ६९ हजारांचा ऐवज लांबवला होता. रामप्रसाद चंदन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या ऐवजाची झाली होती चोरी चोरट्याने २८ हजार रुपये किमतीचे पोतचे चार ग्रॅमचे पॅण्डल, ४२ हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅमचे कानातील झुमके, २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ३५ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची अंगठी, २८ हजार रुपये किमतीचे चार ग्रॅमचे

मंगळसूत्र, १८ हजार रुपये किमतीचे कानातील लटकन, १५ हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स, १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी, ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची सहा ग्रॅमची पोत व १४ हजार रुपये किमतीची चार ग्रॅमची पोत व आठ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली होती.

घरफोडीच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पथकाला केल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार नीलेश चौधरी, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, कॉन्स्टेबल योगेश महाजन, कॉन्स्टेबल सचिन चौधरी आर्दीच्या पथकाने घरफोडीतील आरोपी निष्पन्न करीत त्यास बेड्या ठोकल्या. आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.