मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून बालकाच्या शस्त्रक्रियेसाठी 2 लाख मंजूर

तरुण भारत लाईव्ह: बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. कर्णबधिर बालकाच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नंदुरबार शहरातील गुजर न्हावी गल्लीतील रहिवासी दीपककुमार नांदेडकर यांचा मुलगा अथर्व यास लहानपणापासूनच ऐकू येत नव्हते. अथर्वला आज किंवा उद्या ऐकू येईल अशी कुटुंबीयांची धारणा होती. परंतु 5 ते 6 वर्ष झाल्यानंतरदेखील अथर्वला ऐकण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे बैचन झालेल्या कुटुंबीयांनी मुंबई येथे उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी अथर्व हा कर्णबधिर असल्याचे निदान केले. कर्णबधिर असल्यामुळे त्याला बोलता येणे शक्य होत नसल्याची बाब वैद्यकीय अधिकार्‍यांनी कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिली.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी अथर्ववर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. त्यानुसार, अथर्वच्या वडिलांनी नाशिक येथील इंदूरवाला ईएनटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याचे निर्णय घेतला. शस्त्रक्रियेसाठी साधारणता 7 ते 8 लाख रुपये खर्च येणार आहे. अशातच कौटुंबिक परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे एवढा मोठा खर्च पेलणे अपेक्षित नव्हते.
अथर्वचे वडील दीपककुमार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेऊन अथर्वच्या आजारपणाची माहिती दिली. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वस्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मदत मिळवून देण्याची मागणी केली.

माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशींच्या हस्ते पत्र सुपूर्द

मुख्यमंत्री कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पडताळणी करून प्रकरण मंजूर केले. मुख्यमंत्री कार्यालयाचे निधी व लेखा विभागाचे सहाय्यक संचालकांच्या स्वाक्षरीचे 2 लाखाच्या सहाय्यतेचे मंजुरीचे पत्र सोमवारी प्राप्त झाले. माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते अथर्वचे वडील दीपककुमार नांदेडकर यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी उपस्थित होते.