मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यात २ लाखांवर महिलांची नोंदणी

धुळे : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा याकरीता जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे धुळे जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ४३८ महिलांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या अर्जामध्ये १ लाख ११ हजार ७३८ महिलांनी ऑफलाईन तर ८८ हजार ७०० महिलांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण

धुळे जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री गिरीष महाजन यांचे मार्गदर्शन व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले. त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या नियंत्रणाखाली २ हजार २२८ प्रशिक्षण देण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांमार्फत शहरी व ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांची नोंदणी केली जात आहे.

नारीदूत अॅप सह अर्जासाठी अडीच हजाराहून अधिक केंद्र

जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनाव्दारे या योजनेच्या लाभासाठी अर्ज भरण्यासाठी धुळे जिल्ह्यात ५ हजार ९३८ नागरिकांनी नारीशक्ती दूत अॅप डाऊनलोड केले आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होवून कोणतीही अडचण येवू नये यासाठी जिल्हाभरात २ हजार ५७६ केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शिवाय प्राप्त अर्जाची छाननी समितीमार्फत सुरू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त म हिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.