जळगाव : 2 हजाराची नोट चलनात शनिवार 30 सप्टेंबरपर्यंतच असणार आहे. त्यानंतर ही नोट कायमस्वरूपी बंद होईल. त्यानुसार जळगाव स्टेट बँकेत 2 हजाराची नोट बदलविण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी नागरिक येत आहेत.सोमवार 11 रोजी बँकेचे मुख्य प्रबंधक सिसिर पटनायक यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, 2 हजाराची नोटची 30 सप्टेंबर ही अंतीम मुदत आहे. त्यानंतर ही नोट स्विकारली जाणार नाही. तसेच ही नोट चलनातही राहणार नाही.कायमस्वरूपी 2 हजाराची नोट बंद होईल. नोट बंदचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बँकेत ग्राहक नोट बदलविण्यासाठी येत असून त्या स्विकारण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी 2 हजाराच्या नोटा बदलवून घेतल्या. या महिन्यात दोन हजाराची नोट बदलविणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी आहे. परंतु बहुतांश ग्राहकांनी नोटा जमा केल्या किंवा खात्यात भरणासाठी वापरात आणल्या.
आता नोटबंदीची घोषणा ; नोट बदलण्यास मुदत
यावेळी 19 मे 2023 रोजी 2 हजार रूपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा भारतीय रिझर्व्ह बॅकेंने निर्णय जाहीर केला. ही नोट बदलण्यासाठी तसेच बँकेत जमा करण्यासाठी ग्राहकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली. त्यामुळे ही नोट थेट बंद झाली नाही. ती 30 सप्टेंबरपर्यत चलनात असणार आहे.
एसटी महामंडळाचा 28 सप्टेंबरचा अल्टीमेटम
एसटी महामंडळात जमा होणाऱ्या 2 हजाराच्या चलनी नोटा 30 सप्टेंबर किंवा त्यापूर्वी जमा होणे अंत्यत आवश्यक आहे. अन्यथा 30 सप्टेंबर 2023 नंतर नोटांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी बुधवार 28 सप्टेंबर 2023च्या मध्यरात्री पर्यंतच 2 हजाराच्या नोटा स्विकारल्या जाव्यात.28 सप्टेंबर पर्यत संकलन झालेल्या 2 हजाराच्या नोटा लगेच दुसऱ्या दिवशी 29 सप्टेंबर पर्यत त्या आगारातील संबंधित बँक खात्यात जमा करण्यात याव्यात.28 सप्टेंबर 2023 च्या मध्यरात्रीनंतर कोणत्याही परिस्थितीत 2 हजाराच्या नोटा स्विकारल्या जाणार नाही.याची सर्व विभाग नियंत्रक यांनी आगार पातळीवर या सूचना प्रसारित करून त्याची अंमलबजावणी करावी,असे पत्र विभाग नियंत्रक जळगाव, धुळे, नाशिक, संभाजीनगरसह राज्यातील सर्व आगार प्रमुखांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबईचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांनी दिलेले आहेत.
यापूर्वी रात्रीतून नोटबंदी ; बदलण्यास दिली संधी
यापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने 500 तसेच 1000 रूपयांच्या नोटा रात्रीत बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु या नोटा बदलून देण्यासाठी ग्राहकांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे नोटा बदलविण्याची प्रक्रिया बऱ्याच दिवसांपर्यत देशात चालली होती.
2 हजाराची नोट यासाठी ठरली अल्पायुषी
500 तसेच 1000 हजार रूपयांची नोट चलनातून बंदचा निर्णय झाल्याने मोठ्या प्रमाणात नोटा चलनातून रद्द झाल्या. अर्थकरणाचा वेग कायम राखण्यासाठी सरकारने 2 हजाराची नोट चलनात आणली. परंतु चलनात या नोटचे प्रमाण खूप कमी राहिले. 2 हजार रूपये मुल्याच्या नोटांचा साठवून ठेवण्यासाठी गैरप्रकार होत असल्याचे समोर आल्यानंतर सन 2018-2019 मध्ये रिझर्व्ह बँकेने नोटेची छपाई बंद केली. त्यानंतर 2023 मे मध्ये 2 हजाराच्या नोटेला चलनातून अलविदा करण्याचा निर्णय घेतला.