20 कोटी द्या, पैसे मिळाले नाहीत.. उद्योगपती मुकेश अंबानींना धमकीच्या फोनने खळबळ

मुंबई । भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या व्यक्तीने ईमेलवर 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. जर हे पैसे मिळाले नाहीत तर तो त्यांना ठार मारेल. त्या व्यक्तीने ईमेलमध्ये याचा उल्लेख केला असून याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांना त्यांच्या ईमेल आयडीवर इनबॉक्समध्ये ईमेल लिहिला होता. या ईमेलमध्ये इंग्रजीमध्ये लिहिले होते की, जर मुकेश अंबानींनी त्या अज्ञात व्यक्तीला 20 कोटी रुपये दिले नाही तर त्यांची हत्या केली जाईल. त्या व्यक्तीकडे भारतातील सर्वात मोठे नेमबाज असल्याचे ईमेलमध्ये लिहिले आहे. मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३८७ आणि ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याआधीही मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यापूर्वी, 6 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांनी धमक्या देणाऱ्या बिहारमधील एका व्यक्तीला अटक केली होती. राकेश कुमार मिश्रा असे आरोपीचे नाव आहे.