शेअरमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून तरुणीला २१ लाखांचा गंडा

जळगाव : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त नफा होईल, अशी थाप देत सायबर ठगांनी तरुणीला २१ लाख ७ हजार ४५६ रुपयांना चुना लावला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

तक्रारदार २० वर्षीय तरुणी पदवीचे शिक्षण घेत असून चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी आहे. १७ मे ते ७ जुलै दरम्यान या तरुणीच्या व्हॉट्सॲप तसेच टेलिग्राम या सोशल मीडिया साइटवर साक्षी सिंग या अनोळखी संशयित महिलेने एक लिंक पाठविली. त्यानंतर तक्रारदार तरुणीच्या व्हॉट्सॲपवर मोतीलाल ओसवाल गृप क्यू५ या ग्रुपला जॉईन केले. संशयिताने त्याच्या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावरुन बँक खात्याची माहिती तक्रारदार तरुणीला पाठविली. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास जास्त नफा होईल, असे सांगीतले. तक्रारदाराकडून वेळोवेळी ऑनलाईन आरटीजीएस व एनईएफटी स्वरुपात तब्बल २१ लाख ७ हजार ४५६ रुपये संशयित ठगाने स्विकारले.

नफा तर नाहीच, मात्र मुद्दलही गेली अनोळखी व्यक्तीच्या भुलावणीला बळी पडून तक्रारदार हिने प्रचंड रक्कमेची गुंतवणूक केली. या तरुणीला नफा तर मिळाला नाहीच, पण खात्यात असलेली मुळ रक्कमही गमवावी लागली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने रविवार, ७ रोजी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक एम.एम. कासार हे करीत आहेत.