राज्य शासन आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हाभरात शेतकऱ्यांकडील पशुधनाची गणना करण्यात आली. जिल्हाभरात १ हजार ७९१ गावांत ३२१ प्रगणक अणि ७७पर्यवेक्षकांव्दारे २१ व्या पशुगणना करण्यात आली. ही पशुगणना प्रथमच ऑनलाइन अर्थात ॲपद्वारे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या शासनाकडून एकूण जाहीर होणाऱ्या आकडेवारीनंतरच समोर येणार असत्याचे पश्शुसंवर्धन विभाग प्रशासनाने म्हटले आहे.
१५ तालुक्यांतील १ हजार ७९१ गावांमध्ये झाली पशुगणना
राज्यासह जळगाव जिल्ह्यात ॲपद्वारे संगणकीय २१ व्या पशुगणनेला २५ नोव्हेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. या गणनेसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत होती. परंतु पशुगणनेचे काम अपूर्ण राहिल्याने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच १५ ते २० एप्रिल २०२५ अखेर २१ व्या पशुगणनेचे कामकाज जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील १ हजार ७९१ गावांमधील वाड्या वस्त्यांवर पूर्ण करण्यात आले असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.
पशुपालनाच्या धोरणाची आखणी होणार
जिल्ह्यातील २१ व्या पशुगणनेची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करण्यात आली आहे. त्यात २० व्या पशुगणनेच्या तुलनेनुसार बऱ्याच प्रमाणात वाढ झाली की, घट हे लवकरच केंद्र सरकार जाहीर करणार आहे आणि या पशुगणनेनुसार प्रत्येक राज्याचे पशुपालनाचे धोरण आणि योजना आखण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
या पशुधनाची झाली गणना
२१ व्या पशुगणनेदरम्यान जिल्ह्यातील सर्व कुटुंबे, कौटुंबिक उद्योग, बिगर कौटुंबिक उद्योग व संस्था यांना भेट देण्यात आली. त्यांच्याकडील दुधाळ गोवर्गीय, म्हैसवर्गीय, मेंढी, शेळी, वराह, गाढव, घोडे, शिंगरे, खेचरे, हत्ती, उंट, श्वान, कुक्कुट व कुक्कुटादी पक्षी, यामध्ये कोंबड्या, बदके, शहामृग, गिनी, इमू, आदी पशुंची प्रजातीनिहाय गणना ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली.
पशुगणना चारा-वैरण विकास व लसीकरणासह अन्य योजनांसाठी उपयुक्त
राज्यातील तसेच देशभरातील पशुधनाची अचूक माहिती संकलित व्हावी आणि याद्वारे पशुधनासाठी लागणारे चारा-वैरण, लसीकरणासाठी अद्ययावत पशुपालनाचे धोरण तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. हि पशुगणना केवळ धोरणकर्त्यांसाठीच नाही तर शेतकरी, व्यापारी, उद्योजक, दुग्धउद्योग आणि सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त असल्याने दर पाच वर्षांनी ही गणना केली जात आहे. पशुगणनेमुळे राज्जर राज्यातील पशुधनाची संख्या निर्धारित राज्यातील होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येईल. तसेच योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
२० व्या पशुगणनेत होते १३ लाख पशुधन, तर १० लाख कुक्कुटपक्षी
२० व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात सात लाख ७० हजार ६७९ कुटुंबांकडे १३ लाख सात हजार ५७३ पशुधन आणि १० लाख १७ हजार ४८७ कुक्कुटपक्ष्यांची नोंद होती. या पशुगणनेत १९ व्या पशुगणनेनुसार सरासरी १.९३ टक्के वाढ झाली होती. आता २१ व्या पशुगणेनुसार मार्च २०२५ दरम्यान सुरू असलेल्या पशुगणनेनुसार १० लाख १ हजार १७३ कुटुंबांकडे गोवर्ग ३ लाख ५४ हजार ५४४, म्हैसवर्ग २७ हजार ३५९, मेंढ्या ४ लाख २२ हजार ६३२, शेळ्या ३ लाख ३२ हजार ४१, वराह ९ हजार ११६, घोडे २०७, गाढव ७४ असे सुमारे १२ लाख ५३ हजार ८६० पशुधन आणि २० लाख ५७ हजार २५ अशी कुक्कुटपक्ष्यांची नोंद करण्यात आली होती.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांनंतर जिल्ह्यात नोव्हेंबरदरम्यान पशुगणना सुरू करण्यात आली होती. मार्च अखेर पशुगणनेस ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार एप्रिलच्या दुसऱ्या सप्ताहातच जिल्ह्यात ३२१ प्रगणक आणि ७७ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून एक हजार ७९१ गावांमधील पशुगणना पूर्ण करण्यात आली आहे.
– डॉ. प्रदीप झोड, उपआयुक्त पशुसंवर्धन विभाग, जळगाव