रामदेव बाबांचे 2,300 कोटींचे नुकसान; वाचा काय आहे प्रकरण?

मुंबई : रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद औषधांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने  दिला आहे. यासोबतच बाबा रामदेव यांच्या पतंजली आणि कंपनीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे. पतंजलीने कोविड लसीकरण आणि आधुनिक औषधांविरुद्ध नकारात्मक प्रचार केल्याचा आरोप करत इंडियन मेडिकल असोसिएशनने 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने पतंजलीला फटकारले आहे.

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आयएमएचे वरिष्ठ अधिवक्ता पीएस पटवालिया म्हणाले की पतंजलीने असा दावा केला आहे की योगामुळे दमा आणि मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयएमएने दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत सल्लामसलत आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आदेश दिले होते.

आयएमएचा आरोप आहे की पतंजलीने कोविड 19 लसीकरणाविरोधात बदनामीकारक मोहीम चालवली होती. त्यावर न्यायालयाने पतंजली आयुर्वेदच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ थांबवाव्यात, असा इशारा दिला. कोविडच्या काळात ॲलोपॅथिक फार्मास्युटिकल्सवरील वादग्रस्त टिप्पण्यांसाठी आयएमएने दाखल केलेल्या फौजदारी खटल्यांचा सामना करत असलेल्या रामदेव यांनी ही प्रकरणे रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पतंजली आयुर्वेदने पुढील आदेश येईपर्यंत आपल्या कोणत्याही वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करू नये. त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही वैद्यकीय विधान मीडियामध्ये करू नये, असे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले आहे की या मुद्द्याला ‘ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद’ असा वाद बनवायचा नाही, तर भ्रामक वैद्यकीय जाहिरातींच्या समस्येवर योग्य तोडगा काढायचा आहे. दरम्यान, न्यायालयाने केंद्र आणि आयएमएला नोटीस बजावली आणि पुढील सुनावणीची तारीख 15 मार्च निश्चित केली.

न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आकडेवारीनुसार, BSE मध्ये पतजली फूड्सच्या शेअर्समध्ये सुमारे 4 टक्क्यांची घसरण झाली आणि कंपनीचा शेअर 1556 रुपयांवर आला. तर एक दिवस आधी कंपनीचे शेअर्स 1620.20 रुपयांवर बंद झाले होते. 105 मिनिटांच्या ट्रेडिंग सत्रात रामदेव यांच्या कंपनीचे सुमारे 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले.