जळगाव : जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण करण्यासाठी २४४ कामांना २३१.१९ कोटी रुपयांचा निधीला मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण प्रस्तावाच्या मान्यतेसाठी दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रस्ताव मूल्यांकन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे अभियंता दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
प्रस्ताव मूल्यांकन समितीत जळगाव जिल्ह्यातील २४४ प्रस्तावांच्या २३१.१९ कोटी रुपये एवढ्या निधीस मान्यता देण्यात आली. त्यात प्रामुख्याने जळगाव महानगरपालिका हद्दीतील दोन संरक्षक भिंती, तर सार्वजनिक बांधकाम जळगाव , १३, सार्वजनिक बांधकाम जळगाव विभाग ४९, सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर ३९ , सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग २१ यांना संरक्षक भिंतीच्या कामासाठी अनुदान मंजूर करण्यात आले.
सार्वजनिक पाटबंधारे मंडळ, जळगावसाठी २५ आर्च बंधारे, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणासाठी रिचार्ज शाफ्ट ९४ , निम्न तापी प्रकल्प विभाग अमळनेरसाठी एक सिमेंट नाला, गॅबियन बंधारा या सर्व ठिकाणच्या एकूण २४४ कामांना आजच्या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून मंजुरी देण्यात आली.