जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने २५१ गावे बाधीत, पुन्हा ‘संकट’ उभे!

जळगाव : गेल्या पाच ते सात मार्च दरम्यान अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधीत झाली होती. १३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दरम्यान, पुन्हा १३ ते १७ मार्चला अवकाळी पावसाचे संकट उभे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाउस पडणार असल्याचे संकेत आहेत. पूर्व विदर्भासह तेलंगणा, केरळमध्येही अशीच स्थिती असणार आहे.

‘पश्‍चिमी विक्षोभ’, आणि ‘अल निनो’ यामुळे पावसाचे वातावरण तयार होवून पाऊस पडेल असा अंदाज असल्याची माहिती हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी दिली. समुद्रातील तापमान वाढल्याने पावसाचे वातावरण तयार होत आहे. यामुळे अवकाळी पाऊस पडेल. जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी १३ ते १५, तर काही ठिकाण १४ ते १७ मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे.

दरम्यान रब्बी हंगामातील गहु, हरभरा, ज्वारी, दादर पिके आता परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. नुकतेच अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान एरंडोल, धरणगाव, चोपडा तालुक्यात झाले आहे. जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधीत झाली होती. १३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात कोरडवाहू हरभरा, बाजरी, गहु, मका, ज्वारी, सुर्यफुल, कांदासह केळी, पपई, मोसंबी लिंबूचा सामावेश होता.