जळगाव : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ या हंगामात खरिपातील मुख्य पिके कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर यांच्याकरिता शेतकर्यांनी पिक विमा उतरवलेला होता. एक रुपयात पिक विमा उतरवलेल्या शेतकर्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीत मिड सीजन ऍडव्हर्सिटी २५ टक्के अग्रीम ही जवळपास ८२ कोटी ५२ लाख वितरित झालेले आहे. तसेच आता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत जिल्ह्यातील पात्र एकूण १ लाख ३६ हजार ९३१ शेतकर्यांना ५० हजार १५ लाख रुपये मंजूर झाले असून मंजूर रकमेपैकी २७ कोटी रक्कम ही शेतकर्यांच्या खात्यात वर्ग झालेली आहे व उर्वरित रक्कम ही कंपनीमार्फत वर्ग करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच उत्पन्नावर आधारित झालेल्या नुकसानीचे भरपाई रक्कम शेतकर्यांना लवकरात लवकर मिळावी याकरिता सुद्धा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा सुरू आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकर्यांसाठी ऐच्छिक असली तरी विमा हप्ता नाममात्र एक रुपया इतका कमी असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम २०२४ करिता याचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत करण्यात येत आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ही १५ जुलै २०२४ असली तरी पिक विमा नोंदणीच्या शेवटच्या दिवसातील गर्दी टाळण्यासाठी शेतकर्यांनी त्वरित सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या जवळच्या सीएसी, व्हीएलई केंद्र बँका अथवा शेतकरी ही पीक विमा नोंदणी करता येते. आपले सरकार सुविधा केंद्र धारकास विमा कंपनी मार्फत प्रती अर्ज रु ४० प्रमाणे रक्कम अदा करण्यात येते. त्यामुळे शेतकर्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.